मराठवाडा

बीड: साळेगाव येथून चोरलेल्या विद्युत मोटारी शेतकऱ्यांच्या ताब्यात

अविनाश सुतार

केज: पुढारी वृत्तसेवा: साळेगाव येथून एकाच रात्रीत चोरीला गेलेल्या ८ विद्युत पाणबुडी मोटारींचा पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत छडा लावला. ७ मोटारीसह एकाला ताब्यात घेतले. जप्त केलेल्या मोटारी संबंधित शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्या.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. ४ मे ते ५ मेच्या दरम्यान मध्यरात्री केज तालुक्यातील साळेगाव येथील माळेगावलवण नावाने ओळखले जात असलेल्या भागातील रुपेश घाटूळे, मच्छिंद्र घाटूळे, मल्हारी गित्ते, नारायण बचुटे, अर्जुन वैरागे या शेतकऱ्यांच्या विहिरीतील आठ विद्युत मोटारी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या.

या प्रकरणी पोलिसांनी शोधमोहीम राबवित उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटारी जप्त केल्या. त्यानंतर ओळख पटवून पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी पंचासमक्ष मोटारी शेतकऱ्यांच्या स्वाधीन केल्या.

यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम यादव, दिलीप गित्ते, तांदळे, चंद्रकांत काळकुटे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी मोटारी मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT