बीड : केज तालुक्यात चारचाकीचा अपघात; एक जण जागीच ठार

वडवणी; पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यात शुक्रवारी (दि. २) दुपारी चारचाकी घाटात पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. चिखीलबीड शिवरातील जिवाचीवाडी घाटात ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी (दि. २) केज तालुक्यातील नाहोली येथील ८ भाविक चारचाकीने (क्र MH 16 C 7480) कोठारबन येथील कंदुरी कार्यक्रमाला निघाले होते. दरम्यान चिखीलबीड शिवरातील जिवाचीवाडी घाटात गाडीवरील चालकांचा ताबा सुटल्याने ही गाडी घाटात पलटली. या आपघातामध्ये एकजण जागीच ठार झाला. बापुराव ज्ञानोबा बिक्कड (वय 50 वर्षं रा नाहोली ता.केज जि.बीड) असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर चालक बालाजी मोराळे (बाणेगाव ता. केज), विठ्ठल देशमुख, रामा आंधळे हे गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच वडवणी पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस हवालदार नवनाथ ढाकणे, पोलीस हेडकॉन्स्टेबल आदिनाथ तांदळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक अघाव, यांनी घटनास्थळी तातडीने जाऊन जखमींना बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले व या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. मयताचे शवविच्छेदन चिंचवण ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.