मराठवाडा

युक्रेनमध्ये गंगाखेडचा युवक अडकल्‍याने कुटुंबीय चिंतेत; सरकारकडून विशेष प्रयत्‍नाची अपेक्षा

निलेश पोतदार

गंगाखेड; प्रमोद साळवे : गंगाखेड (जि. परभणी) शहरातील रहिवासी व वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमधील ओदेसा Odesa येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेला संकेत राघवेंद्र पाठक हा युवक युक्रेनमध्ये अडकला आहे. दरम्यान तो सुरक्षित आहे. परंतु तेथील परिस्थिती पाहता युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकारने त्वरित परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा पाठक कुटुंबाची आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, मागील दोन-तीन दिवसांपासून युक्रेन विरुद्ध रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतातून युक्रेनमध्ये विविध कारणास्तव गेलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबद्दल देशात चिंता पसरली आहे. गंगाखेड शहरातील संकेत पाठक हा विद्यार्थी ओदेसा नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. शिक्षणाचे उर्वरित केवळ तीन ते चार महिने राहिले असतानाच युक्रेनमध्ये रशियाविरुद्ध युद्धाची पार्श्वभूमी तयार झाल्याने गंगाखेड शहरातील पाठक कुटुंबीय चिंतेत पडले आहेत.

संकेतने कुटुंबियांशी संपर्क साधला आसून, सद्यस्थितीत तो सुरक्षित आहे. परंतु मोठ्या प्रमाणात हल्ल्यांचे सत्र सुरू असून आगामी काळात ही परिस्थिती बिघडण्याची शक्यता संकेतने व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने तातडीने युक्रेनमध्ये असलेल्या भारतीयांना भारतात आणण्यासाठी व्यवस्था करण्याची नितांत गरज असल्याचे मत त्याच्या पालकांनी व्यक्त केले. संकेतचे वडील सराफा व्यावसायिक आहेत.

पाठक कुटुंबियांचे मित्र तथा प्रसिद्ध विधिज्ञ नंदकुमार काकानी यांनी या पार्श्वभूमीवर पुढारीशी बोलताना सांगितले की, युक्रेनमधील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत आहे. आगामी काळात इंटरनेट व दळणवळण व्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी भारत सरकारने लवकरात लवकर सकारात्मक प्रयत्न करून येथील नागरिकांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न करावेत.

SCROLL FOR NEXT