Woman's death: Case filed against 3 doctors
परभणी, पुढारी वृत्तसेवा उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी परभणीतील पांडुरंग हॉस्पिटलमधील ३ डॉक्टरांविरुद्ध नवा मोंढा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. वैद्यकीय अँजिओप्लास्टीदरम्यान निष्काळजीपणा, उपचारांसाठी ६० हजार रुपये घेणे, सीसीटीव्ही फुटेजबाबत चुकीची माहिती देणे आणि फसवणूक केल्याचे आरोप फिर्यादीने केले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर गुरुवारी (दि. १७) हा गुन्हा नोंदविण्यात आला. डॉ. व्यंकटेश डुब्बेवार, डॉ. व्यंकटेश हराळे आणि डॉ. सागर चेउलवार अशी गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांची नावे आहेत.
फिर्यादी भाऊसाहेब पंडितराव झोल यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या आई निलावतीबाई झोल यांना छातीत दुखत असल्याने ७ मार्च २०२३ रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ईसीजी आणि टू-डी इको तपासणीनंतर अँजिओग्राफी केली. रक्तवाहिनीत ब्लॉकेज आढळल्यानंतर अँजिओप्लास्टी सुरू करण्यात आली.
सुरुवातीला डाव्या हाताच्या धमनीतून प्रक्रिया करण्याचा प्रयत्न झाला; मात्र तो अयशस्वी झाल्याची माहिती नातेवाइकांना देण्यात आली नाही, असा आरोप फिर्यादीने केला आहे. त्यानंतर उजव्या मांडीच्या धमनीतून प्रक्रिया करण्यात आली. स्टेंट बसविताना रक्तस्राव न थांबल्याने प्रकृती खालावून आईचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
आवश्यक तज्ज्ञांची मदत न घेतल्याचा आरोपही डॉक्टरांवर करण्यात आला. या प्रकरणी फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सहायक पोलीस निरीक्षक खंदारे करीत आहेत. संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच प्रतिक्रिया मिळू शकली नाही
जनआरोग्य योजनेच्या उपचारांसाठी पैसे घेतल्याचा आरोप
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून उपचार होतील आणि नातेवाइकांना पैसे भरावे लागणार नाहीत, असे सांगण्यात आले होते. मात्र, योजना मंजूर होईपर्यंत ६० हजार रुपये भरण्यास सांगून ही रक्कम घेतल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.
सीसीटीव्ही फुटेजबाबतही तक्रार
घटनेच्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज मागितल्यानंतर सुरुवातीला रिकामी सीडी देण्यात आली, तर नंतर दुसऱ्या दिवसाचे फुटेज देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत आहे. तसेच प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन फसवणूक केल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे.