

मानवत : मानवत शहरातील उक्कलगाव रोडवरील महाकाली मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी साऊंड सिस्टिम, माईक आणि साऊंड बॉक्ससह अन्य साहित्य चोरून नेल्याची घटना १७ व १८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री घडली. नवरात्रोत्सव सुरू असतानाच मंदिरात चोरी झाल्याने भाविकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असून, परिसरातील धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महाकाली मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त दररोज सकाळी आणि सायंकाळी आरती, भजन यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या काळात मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. भाविकांना सूचना देण्यासाठी तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी मंदिरात साऊंड सिस्टिम, माईक आणि साऊंड बॉक्सची व्यवस्था करण्यात आली होती.
मात्र, १७ आणि १८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर मंदिरातील साऊंड सिस्टिम, माईक आणि साऊंड बॉक्ससह अन्य साहित्य चोरून नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात आलेल्या भाविकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ दूरध्वनीद्वारे पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि पंचनामा केला. या चोरीमुळे नवरात्रोत्सवातील धार्मिक कार्यक्रमांसाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपक यंत्रणेची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. चोरीला गेलेले साहित्य हस्तगत करून चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिरात चोरी झाल्याने भाविकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील धार्मिक स्थळांची सुरक्षा अधिक कडक करण्याची मागणीही होत आहे.