Parbhani News : गोदावरी नदीपात्रातील अवैध रेतीउपसा रोखण्यासाठी चार तराफे जाळून नष्ट

पूर्णा महसूल पथकाची कारवाई; १० ब्रास रेती जप्त
Parbhani News : गोदावरी नदीपात्रातील अवैध रेतीउपसा रोखण्यासाठी चार तराफे जाळून नष्ट
Published on: 
Updated on: 

पूर्णा : पूर्णा तालुक्यातील सातेफळ (वाघ) जुनागावजवळ गोदावरी नदीपात्रात विनापरवाना अवैध रेतीउपसा करणारे चार तराफे महसूल विभागाच्या पथकाने १७ ऑक्टोबर रोजी दुपारी जाळून नष्ट केले. या कारवाईत रेतीउपसा करण्यासाठी वापरण्यात येणारे तराफे नष्ट करण्यात आले, तर साठवून ठेवलेली १० ब्रास रेती जप्त करण्यात आली.

गोदावरी नदीपात्रात तराफ्यांच्या साहाय्याने अवैध रेतीउपसा सुरू असल्याची गुप्त माहिती महसूल अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार तहसीलदार प्रशांत थारकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने ही कारवाई केली. या पथकात मंडळ अधिकारी धनंजय टेकाळे, ग्राम अधिकारी कवडे, कोतवाल देवणे, गडगिळे, मोरे, कोमटवार आणि वाहनचालक शेलाटे यांचा समावेश होता. कारवाईदरम्यान चुडावा पोलिस ठाण्याचे बीट जमादार प्रभाकर कच्छवे आणि पोलीस कर्मचारी गुरवंत यांनी पोलिस बंदोबस्त पुरविला.

गोदावरी, पूर्णा नदीपात्रांत अवैध उपशाची चर्चा

दरम्यान, मागील काही दिवसांपासून पावसाअभावी कोरड्या पडलेल्या नदीपात्रांचा फायदा घेत गोदावरी आणि पूर्णा नदीपात्रातील काही ठिकाणी अवैध रेतीउपसा व वाहतूक सुरू असल्याची चर्चा स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये आहे. काही ठिकाणी टेहळणीसाठी व्यक्ती नेमून गुप्तपणे रेतीउपसा केला जात असल्याचेही नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

अवैध रेतीउपसा तसेच कठीण दगड, मुरूम यांसारख्या गौण खनिजांचे उत्खनन आणि वाहतूक रात्रीच्या वेळीही सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी महसूल विभागाने नियमित गस्त घालून कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news