Parbhani Rain : पूर्णा परिसराला अवकाळी पावसाने झोडपले, खरीप गेले आता रब्बी हंगामही आला धोक्यात  File Photo
परभणी

Parbhani Rain : पूर्णा परिसराला अवकाळी पावसाने झोडपले, खरीप गेले आता रब्बी हंगामही आला धोक्यात

शेतकऱ्यांची कोंडी

पुढारी वृत्तसेवा

Unseasonal rains lashed the Purna area, Kharif is over and now the Rabi season is also in danger

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात रविवारी दुपारी पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील पांगरा, मरसूळ, वाई, पिंपळा, लोणधार, चुडावा या भागांत दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास तब्बल एक तास मुसळधार पाऊस कोसळला. मागील चार-पाच दिवसांपासूनच परिसरात अधूनमधून अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. खरीप गेल्यानंतर आता रब्बी हंगाम धोक्यात आला असून शेतकरी पुन्हा चिंतेत सापडले आहेत.

यावर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात तालुक्यातील विविध भागांमध्ये अतिवृष्टी, पूर व ढगफुटी झाली. त्यामुळे खरीप हंगाम अक्षरशः वाहून गेला. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यांसारखी पिके पाण्याखाली गेली. काही ठिकाणी संपूर्ण शेतीचे नुकसान झाले.

खरीपातील तोटा भरून काढण्यासाठी शेतकरी रब्बी पिकांकडून आशा धरत होते. मात्र आता पुन्हा अवकाळी पावसामुळे ही आशा मावळताना दिसत आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. खरीप हंगामात नुकसान सोसून शेतकऱ्यांनी कर्ज काढून रब्बी हंगामासाठी तयारी केली होती. मात्र पावसाने पुन्हा अडथळा आणल्याने बियाणे पेरणीस अडचण निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. काही शेतकरी तर वैफल्यातून आत्महत्येच्या मार्गाकडे वळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीच्या मोठमोठ्या घोषणा झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात अनुदान अपुरेच मिळत आहे.

अनेक शेतकरी अद्याप सरकारी भरपाई आणि विमा योजना लाभापासून वंचित आहेत. प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत दावा दाखल करूनही अद्याप शेतकऱ्याला भरपाई मिळालेली नाही. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने भरीव मदत जाहीर करावी, विमा भरपाई तत्काळ वितरित करावी आणि कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागाचा तातडीने पंचनामा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

महसूल, कृषी व विमा कंपनीच्या संयुक्त पथकाने तालुक्यातील ३६ ठिकाणी सोयाबीन कापणी प्रयोग केले. उत्पादन अतिशय कमी आले असतानाही भरपाईबाबत कोणतीही स्पष्टता दिली नाही. शेतकऱ्यांनी विम्याचे हप्ते भरले, पण नुकसान भरपाई मिळणार की नाही याची खात्री नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT