जय जवान जय किसान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय pudhari photo
परभणी

‌Parbhani News : ‘त्या‌’ पर्यवेक्षकाचा अहवाल शिक्षण विभागास देणार

बीईओ कापसीकर यांची माहिती; कावलगावच्या 12 वीच्या परीक्षा केंद्रावरील प्रकरण

पुढारी वृत्तसेवा

पूर्णा : तालुक्यातील कावलगाव येथील जय जवान जय किसान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या परीक्षेदरम्यान अनधिकृत पर्यवेक्षक नियुक्तीचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) च्या विशेष पथकाने अचानक तपासणी करताच अधिकृत यादीत नसलेले शिक्षक प्रत्यक्ष कक्षावर कार्यरत आढळले. याबाबतचा अहवाल लवकरच शिक्षण विभागाला सादर करणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी बालाजी कापसीकर यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली आहे.

सोमवारी (दि.16) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) च्या पथकाने परीक्षा केंद्राला भेट दिली. पथकातील सदस्य डॉ.अतुल चंद्रमोरे यांनी प्रश्नपत्रिकांचे रॅपर्स, पर्यवेक्षकांची अधिकृत यादी आणि प्रत्यक्ष उपस्थित शिक्षकांची पडताळणी केली. यावेळी दालन क्रमांक 3 वर एस.एल.पवार हे पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असल्याचे दिसून आले, मात्र त्यांच्या नावाचा अधिकृत यादीत समावेश नव्हता.

या प्रकाराबाबत केंद्रप्रमुख एस.एल.धुमाळे यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नसल्याचे समजते. त्यामुळे संबंधित शिक्षक व त्यांना अनधिकृतपणे पाठविणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गटशिक्षणाधिकारी बालाजी कापशीकर यांनी सांगितले की, केंद्र संवेदनशील असल्याने स्थानिक शिक्षकांऐवजी बाहेरील शिक्षकांची नेमणूक केली.

काही शिक्षक अनुपस्थित राहिल्याने संबंधित कॉलेजने 9 फेब्रुवारीचे पत्र दाखवत पर्यायी नियुक्ती केल्याचे स्पष्ट केले. महाविद्यालयाचा खुलासा प्राप्त होताच तो शिक्षण विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बारावी सारख्या महत्त्वाच्या परीक्षे दरम्यान अधिकृत प्रक्रियेचे उल्लंघन झाल्याचा आरोप गंभीर मानला जात आहे.

तोंडी आदेश आणि नंतरचे पत्र या प्रकारामुळे प्रशासनातील समन्वयाचा अभाव उघड झाला. डाएट पथक यात कारवाई करणार का, याकडे पालक व जनतेचे लक्ष लागले. शिक्षण व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या प्रकरणाचा निकाल काय लागतो, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

न्यायालयाच्या आदेशामुळे घाई : प्राचार्यांचे स्पष्टीकरण

पूर्णा येथील श्री गुरुबुध्दी स्वामी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ.के.राजकुमार यांनी सांगितले की, काही संवेदनशील महाविद्यालयांना यंदा परीक्षा केंद्र देण्यात येणार नव्हते, मात्र न्यायालयाच्या आदेशामुळे परीक्षा केंद्र पूर्ववत सुरू ठेवावे लागले. त्यामुळे पर्यवेक्षक नियुक्तीत घाईगडबड झाली असावी. काही प्राध्यापक अनुपस्थित राहिल्याने पवार यांना पर्यवेक्षक म्हणून पाठविण्यात आले असून यात गैर काही नाही, असे त्यांनी नमूद केले. गटशिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता असल्याचाही दावा त्यांनी यावेळी बोलताना केला.

तोंडी आदेशावर नियुक्ती : केंद्रप्रमुखांचा दावा

केंद्रप्रमुखांच्या माहितीनुसार, 250 विद्यार्थी येथे परीक्षा देत आहेत. केंद्र ‌‘संवेदनशील‌’ असल्याने स्थानिक शिक्षकांऐवजी पूर्णेतील श्री गुरुबुध्दी स्वामीसह अन्य महाविद्यालयांतील शिक्षकांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यातील एका शिक्षकाच्या अनुपस्थितीमुळे गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशानुसार एस.एल.पवार यांना पर्यवेक्षक म्हणून पाठविल्याचा दावा केला. मात्र, पवार यांनी कार्यभार स्वीकारताना कोणतेही अधिकृत नियुक्तीपत्र सादर केले नव्हते. त्यामुळे डाएट पथकाने त्यांची नियुक्ती अनधिकृत ठरवली. त्यानंतर शेख यांच्याऐवजी पवार यांची नियुक्ती केल्याचे पत्र मंगळवारी केंद्रावर प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT