Parbhani Municipal Election : परभणी महापालिकेवर ठाकरेंचा भगवा, काँग्रेसच्या साथीने सत्ता काबीज File Photo
परभणी

Parbhani Municipal Election : परभणी महापालिकेवर ठाकरेंचा भगवा, काँग्रेसच्या साथीने सत्ता काबीज

अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या ठरलेल्या परभणी महानगरपालिका निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा 'मातोश्री'वर विश्वास दाखवला आहे.

पुढारी वृत्तसेवा

The Thackeray faction of Shiv Sena is in power in the Parbhani Municipal Corporation

परभणी, पुढारी वृत्तसेवा :

अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या ठरलेल्या परभणी महानगरपालिका निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा 'मातोश्री'वर विश्वास दाखवला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि काँग्रेस आघाडीने जोरदार मुसंडी मारत महापालिकेवर आपला झेंडा फडकवला आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाला तब्बल २५, तर काँग्रेसला १२ जागा मिळाल्या असून, सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारांनी नाकारले आहे.

राज्यात सत्तेत असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. भाजपसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर राष्ट्रवादीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या. मात्र, या हायप्रोफाईल प्रचारानंतरही महायुतीला अपेक्षित यश मिळू शकले नाही. पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि भाजपचे निवडणूक प्रमुख माजी आ. सुरेश वरपूडकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, ३७ जागा लढवणाऱ्या भाजपला केवळ १२ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

या निवडणुकीत विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाने तीन जागा जिंकत महापालिकेत प्रवेश केला आहे. तसेच, आ. रत्नाकर गुट्टे यांच्या यशवंत सेनेने एका जागेवर विजय मिळवला असून, एका अपक्ष उमेदवारालाही मतदारांनी कौल दिला आहे.

राष्ट्रवादीची रणनीती फेल; एमआयएम हद्दपार

राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) मुस्लिम मतांवर डोळा ठेवून तब्बल २७ मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवले होते. मात्र, ही रणनीती पूर्णपणे फसली. विसर्जित महापालिकेत राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक होते, मात्र यावेळी त्यांना जोरदार धक्का बसला असून त्यांच्या ७ जागा कमी झाल्या आहेत. दुसरीकडे, एमआयएमने १९ जागा लढवत निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, परंतु मुस्लिम मतदारांनी एमआयएमला सपशेल नाकारल्याने त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.

ठाकरे गटाची एकहाती पकड

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणेच महापालिका निवडणुकीतही परभणीकरांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पारड्यात भरभरून मते टाकली. खा. संजय जाधव यांचे मार्गदर्शन आणि आ. डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या या निवडणुकीत शिवसेनेने (ठाकरे गट) २५ जागा जिंकत शहरावर आपली पकड सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे, ३५ उमेदवार उभे करणाऱ्या शिवसेनेच्या शिंदे गटाला या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही.

आ. राहुल पाटलांचे नेतृत्व सिद्ध

परभणी महापालिकेवर भगवा फडकवून आमदार डॉ. राहुल पाटील यांनी पुन्हा एकदा आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने सर्व ताकद लावूनही राहुल पाटील यांनी आपल्या नियोजनाने आणि जनसंपर्काने विरोधकांचे मनसुबे उधळून लावले. सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा या निकालाने मोठा स्वप्नभंग झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT