

Parbhani Municipal Corporation Election Result
परभणी : परभणी महापालिकेत भाजपचा महापौर होणे शक्य नाही, कारण येथील मतदारांनी शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी कौल दिला आहे. त्यामुळे सर्वप्रथम जनतेचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी दिली आहे.
ते पुढे म्हणाले की, आम्ही सुरुवातीपासून सांगत होतात की, परभणी मध्ये भाजपाला दोन आकडेही गाठता येणार नाहीत. मात्र, त्यांनी दोन आकडे गाठले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खाते उघडणार नाही आणि ते उघडलेही नाही. परभणीमध्ये भाजपाचा महापौर होणे शक्य नाही आणि तो होणार ही नाही.
भाजपाचे जे काही उमेदवार निवडून आले आहेत ते चिल्लरीवर निवडून आले आहेत. परभणीच्या जनतेने शिवसेनेचा पहिला महापूर बसवला आहे. त्यामुळे मी जनतेचे अभिनंदन करतो. जिल्हा परिषदेची निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढू आणि जिल्हा परिषदेवर देखील शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबईमध्ये अपयश आले आहे. मात्र, भाजप हे सर्व पैशांच्या जोरावर करत आहे. भाजपला सत्तेची इतकी हवा लागली आहे की, ते खेड्यापर्यंतच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालत आहेत, असे जाधव म्हणाले.
परभणी महानगरपालिकेमध्ये विरोधकांची धूळधाण उडाली आहे शिवसेना आणि काँग्रेसचे 37 उमेदवार निवडून आले आहेत त्यामुळे परभणी महानगरपालिकेवर शिवसेनेचाच महापौर बसणार असा विश्वास आमदार डॉ. राहुल पाटील यांनी म्हटले आहे. परभणी शहरातील विकास कामे करण्यासाठी मी आमदार म्हणून निधी आणून विकास करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.