

Purna Panchayat Samiti Election
पूर्णा : पूर्णा तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती गणांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने १२ जानेवारी रोजी जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तालुक्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
या निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून महसूल प्रशासन पूर्ण तयारीनिशी सज्ज असल्याची माहिती तहसीलदारांनी १५ जानेवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पूर्णा तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट आणि त्याअंतर्गत बारा पंचायत समिती गणांसाठी एकूण १ लाख ५६ हजार ५१३ मतदार असून १४२ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत व यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून आवश्यक अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये नोडल अधिकारी, बैठे पथके तसेच फिरती पथके यांचा समावेश आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १६ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जांची छाननी २२ जानेवारी रोजी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २७ जानेवारी आहे. याच दिवशी दुपारनंतर निवडणूक चिन्हांचे वाटप तसेच अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. मतदान ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार असून मतमोजणी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे. निवडणूक काळात अधिकारी व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, पूर्णा तालुक्यात एरंडेश्वर, कावलगाव, वझूर, ताडकळस, गौर आणि चुडावा असे सहा जिल्हा परिषद गट असून प्रत्येक गटातून दोन याप्रमाणे एकूण बारा पंचायत समिती गण आहेत. या निवडणुकीत सहा जिल्हा परिषद सदस्य आणि बारा पंचायत समिती सदस्य निवडून दिले जाणार आहेत.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच विविध राजकीय पक्षांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची जोरदार धावपळ सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजप, शिवसेना (शिंदे गट), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या पक्षांतील कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार सक्रिय झाले आहेत. काही इच्छुकांकडून आपली उमेदवारी निश्चित झाल्याचे दावेही केले जात आहेत.
महायुतीतील पक्षांची वरच्या पातळीवर युती असली तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ही युती कायम राहणार का, तसेच महाविकास आघाडीतील पक्ष जिल्हा परिषद निवडणुकीत एकत्र येणार का, याबाबत लवकरच चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. युती न झाल्यास सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या काही गट व गणांमधून संभाव्य उमेदवारांची नावे पुढे येत असली तरी अनेक ठिकाणी अद्याप इच्छुकांची नावे समोर आलेली नाहीत. अनेक वर्षांनंतर ही निवडणूक होत असल्याने अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून रणांगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. पुढील काही दिवसांत अधिकृत उमेदवारांची तसेच बंडखोर व अपक्ष उमेदवारांची नावे स्पष्ट होतील आणि निवडणुकीचे चित्र ठळक होईल.