पूर्णा : तालुक्यात फेब्रुवारी अखेरपासून उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा देणाऱ्या ऊस रसवंतीगृहांची सर्वत्र लगबग सुरू झाली आहे. शहरासह पूर्णा-झिरोफाटा मार्ग, चुडावा रोड तसेच ताडकळस मार्गावरील विविध ठिकाणी ऊस रसवंती केंद्रे सुरू झाली असून, दुपारच्या सुमारास या ठिकाणी ग्राहकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे.
पूर्णा-झिरोफाटा मार्गावरील माटेगाव, कात्नेश्वर, झिरोफाटा परिसरात तसेच चुडावा रोडवरील गौर, न-हापूर, चुडावा, पिंपळा भत्या येथे रस्त्यालगत रसवंतीगृहे उभारण्यात आली आहेत. ताडकळस मार्गावरील तहसील कार्यालय परिसर व खुजडा येथेही काही उपहारगृहांनी ऊस रस केंद्रे सुरू केली आहेत. उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे सकाळपासूनच ग्राहकांची वर्दळ सुरू होते, तर दुपारी आणि सायंकाळी तर गर्दीचा उच्चांक गाठला जातो.
लोखंडी व स्टीलच्या चरख्यावर ऊस पिळून ताजा गोड रस काढला जात आहे. त्यात लिंबूरस, काळे मीठ व खास मसाला टाकून ग्राहकांना थंडगार रस दिला जातो. एका ग्लासासाठी 10 रुपये दर आकारला जात असून, कमी किमतीत नैसर्गिक व ताजे पेय मिळत असल्याने नागरिक रसायनयुक्त शीतपेयांऐवजी ऊसाच्या रसाला पसंती देत आहेत. अनेक ग्राहक तर सलग तीन-चार ग्लास रस पिऊन तहान भागवत आहेत.
यंदा काही हॉटेल व्यावसायिकांनी स्वतःच्या शेतात ऊस लागवड करून उन्हाळाभरासाठी आवश्यक ऊस राखीव ठेवला आहे. चुडावा-पूर्णा रोडवरील नऱ्हापूर गाव परिसरात अनेक शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून रसवंतीगृहे सुरू केली आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळत आहे. ज्यांच्याकडे स्वतःचा ऊस उपलब्ध नाही, असे रसवंतीधारक इतर शेतकऱ्यांकडून सुमारे 3 हजार रुपये प्रति टन दराने ऊस खरेदी करत आहेत.
मे महिन्याच्या अखेरपर्यंत ऊसाचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांशी आगाऊ करार केल्याचेही समजते. उन्हाळ्याच्या पाश्वभूमीवर नैसर्गिक, आरोग्यदायी आणि परवडणारे पेय म्हणून ऊसाचा रस पुन्हा एकदा नागरिकांच्या पसंतीस उतरत असून, या व्यवसायातून शेतकरी व लघुउद्योजकांना चांगला आर्थिक फायदा होत आहे. आगामी दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता असल्याने रसवंतीगृहांवरील गर्दीही वाढण्याची चिन्हे आहेत.