

परभणी : जिल्हाभरातील भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि.2) आपल्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात काम बंद आंदोलन केले. आंदोलनासाठी जिल्हाभरातील भूमी अभिलेख विभागातील कर्मचारी एकवटल्याचे दिसून आले.
भूमी अभिलेख कर्मचारी कृती समितीच्या वतीने आपल्या विविध मागण्यासंदर्भात सरकार सोबत असहकार पुकारला आहे. तांत्रिक वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, सुधारीत आकृतीबंद भू-करमापक व परीक्षण भू-करमापक यांच्या वाढीव पदासह, मोजणी कर्मचाऱ्यांना निश्चित प्रवास भत्ता ठरवून तो वेतनामध्ये समाविष्ठ करण्यात यावा, इतर विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुरेसी तांत्रिक माहिती नसल्याने त्यांना भूमी अभिलेख विभागात बदली अथवा प्रतिनियुक्ती देवू नये, विभागाचे खाजगीकरण करण्याचा निर्णय रद्य करण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या.
शेतरस्ते मोजणी व हद्द कायम बाबत 19 ऑगस्ट-2025 च्या शासन निर्णयात सुधारणा करावी. मोजणी ही बाब धोरणात्मक बाब म्हणून अंतर्भूत करण्यात येवू नये, भूमी अभिलेख विभाग हा तांत्रिक विभाग असल्याने जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख हे संवर्ग पद भारतीय अभियांत्रिकी सेवेतून भरण्यात यावेत, उपसंचालक भूमीअभिलेख कमलाकर हट्टेकर यांची पुणे विभागाबाहेर बदली करण्यात यावी, आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत.
जमा बंदी आयुक्त स्तरावर ई-मोजणी व्हर्जन-2 हे सॉप्टवेअर व्हर्जन-1 प्रमाणे सुटसुटीत व वापरास सोपे करावे, अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नियुक्ती प्राधिकारी यांच्या परवानगी व चौकशी शिवाय थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची चुकीची व अमानवी पद्धत रद्द करण्यात यावी, 18 मोजणी प्रकरणांबाबत 14 जानेवारी 2026चे अन्यायकारक परिपत्रक रद्द करण्यात यावे, प्रत्येक कर्मचाऱ्याला पुरेसे व स्वतंत्र्य मोजणी साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या स्तरावर नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेले वसुली आदेश थांबविण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे. आंदोलनात भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.