Bus ticket price increase : उन्हाळी गर्दीचा झटका, एसटी प्रवास महागणार pudhari photo
परभणी

Bus ticket price increase : उन्हाळी गर्दीचा झटका, एसटी प्रवास महागणार

१५ एप्रिलपासून बसभाड्यात १० टक्के वाढ; दोन महिन्यांसाठी तात्पुरता दरवाढीचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

ST travel will become more expensive

परभणी, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील वाढती उन्हाळी सुट्टीतील गर्दी, सणासुदीचा हंगाम आणि प्रवाशांची प्रचंड वाढ लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) पुन्हा एकदा परिवर्तनशील भाडेवाढीचा कठोर निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे साध्या बससेवांमधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर थेट भार पडणार आहे. शासनमान्य आदेश व राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनुसार ही भाडेवाढ १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत लागू राहणार असून, या काळात साध्या बससेवांचे भाडे १० टक्क्यांनी वाढवले जाणार आहे.

एसटी प्रशासनाने घेतलेला हा निर्णय प्रामुख्याने साधी, जलद आणि रात्रसेवा बस यांना लागू असेल. या सेवांमधून दररोज प्रवास करणारे हजारो ग्रामीण व शहरी प्रवासी या दरवाढीमुळे थेट प्रभावित होणार आहेत. दरवाढीच्या या निर्णयात काहीसा दिलासा देत एसटी महामंडळाकडून काही बस सेवांमध्ये कोणत्याही प्रकारची दरवाढ करण्यात आली नाही. यात शिवशाही (वातानुकूलित), शिवनेरी / जनशिवनेरी, निमआराम सेवा, शयनआसनी व शयनयान, ई-बस (९ मीटर व १२ मीटर) यांची या सर्व प्रीमियम व एसी सेवांचे दर जसेच्या तसे कायम ठेवण्यात आले आहेत.

नवीन हंगामी भाडे दर १५ एप्रिल च्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. त्या क्षणानंतर सुरू होणाऱ्या प्रत्येक प्रवासावर वाढीव दराने तिकीट आकारले जाणार आहे. आगाऊ आरक्षण केलेल्या प्रवाशांकडून जुन्या व नवीन दरातील फरक वसूल केला जाणार आहे. तसेच १४ एप्रिल रोजी सुरू झालेल्या व १५ एप्रिलनंतर संपणाऱ्या प्रवासाला सूट देण्यात आली असून पासधारकांना मात्र पूर्ण संरक्षण देण्यात आले.

एसटी प्रशासनाने स्पष्ट केले की, मासिक पास, त्रैमासिक पास, विद्यार्थी पास यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. आवडेल तेथे कोठेही प्रवास या योजनेतही बदल करण्यात आला नाही. इटीआयएम मशीनवर तांत्रिक बदल करून संपूर्ण यंत्रणा अपडेट करण्यात आली. भाडेवाढ अंमलबजावणीसाठी एसटीच्या सर्व आगारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या इटीआयएम प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात येत आहे. (वाहक) कंडक्टरांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की, नवीन दर लागू करण्यासाठी मशीनमध्ये फेअर कॅलक्युलेशन व रूट सिंक प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असेल.

तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी २४७ इंजिनिअरिंग सपोर्ट, महसूल वाढीचा उद्देश, प्रशासनाची कठोर देखरेख, उन्हाळी गर्दीच्या काळात प्रवासी संख्या वाढत असल्याने एसटीला अतिरिक्त महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या बजेटवर ताण येणार हे स्पष्ट झाले आहे. यासाठी प्रत्येक विभागात नियंत्रण कक्ष स्थापन करून भाडेवाढीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

१५ जूननंतर पुन्हा जुन्या दरांची पुनर्स्थापना

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दि. १५ एप्रिल ते १५ जून दरम्यान रा.प. प्राधिकरणाच्या मंजुरीनुसार आणि शासन परिपत्रकानुसार ही परिवर्तनशील भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन महिन्यांच्या कालावधीत एसटीने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना वाढीव भाड्याचा फटका बसणार आहे. उन्हाळी गर्दीचा कालावधी संपल्यानंतर म्हणजेच १६ जून पासून पुन्हा मूळ भाडेदर लागू करण्यात येणार आहे. एसटी प्रशासनाने या निर्णयाला तात्पुरती गर्दी व्यवस्थापनात्मक उपाययोजना असे संबोधले असले तरी, प्रत्यक्षात मात्र सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर दोन महिन्यांचा अतिरिक्त भार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT