Soybean Crop Insurance
पूर्णा : पूर्णा तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२४ च्या ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने बाधीत सोयाबीन पीक कापणी पश्चात (हार्वेस्टिंग) नुकसान भरपाईसाठी क्लेम दाखल केले होते. त्यावरुन आयसीआयसीआय लोंबार्ड पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी ऑनलाईन क्लेम प्राप्त शेतकऱ्यांची यादी काढून सोयाबीन पीक बाधीत क्षेत्राचा पाहणी सर्व्हे केला.
काढणीपश्चात सोयाबीन पीक विमा नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाने शेवटचा हप्ता १ हजार कोटी विमा कंपन्यास अदा करण्याचे आश्वासन जून महिन्याच्या सुरुवातीस दिले होते. परंतु अद्याप हा १ कोटीचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे हे आश्वासन सध्यातरी हवेतच विरले असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, संबंधित शेतकऱ्यांना काढणीपश्चात सोयाबीन पीक पोटीची नुकसान भरपाई मिळणे दुरापास्त झाले आहे.
पीक विमा देण्यात येईल, म्हणून आश्वासीत करुन सरकारने शेतक-यांच्या कोपराला गुळ लावून चाटत बसायला लावल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याआधी २० ऑक्टोबररोजी तक्रार केलेल्या काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा केली. त्याच बरोबर काही शेतकऱ्यांनी १९ व २१ ऑक्टोबर रोजी सोयाबीन पीक काढणीपश्चात नुकसान भरपाई मिळण्यासाठी क्लेम दाखल केला होता. त्याचा बाधीत सोयाबीन पीक पाहणी सर्व्हे देखील करण्यात आला.
मात्र, नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाने हप्ताच जमा केला नाही. सर्व्हे केलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून १ हजार कोटी रुपये हप्ता जमा झाल्यावर नुकसान भरपाई मिळणार असल्याचे पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात येत आहे. हप्ता जमा आज होईल उद्या होईल? म्हणून शेतकरी प्रतीक्षा करुन थकून गेले आहेत. पीक विमा भरपाई मिळाली असती तर यंदाच्या खरीप हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता. मात्र, तसे न झाल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना आडते व सावकाराकडून व्याजाने पैसे काढून पेरणी करावी लागली. यातच, आता पावसाने उघडीप दिल्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.