परभणी

Shekap Leader Death | गोदाकाठचा क्रांतिसिंह काळाच्या पडद्याआड; शेकापचे ज्येष्ठ नेते भाई लक्ष्मणराव गोळेगावकर यांचे निधन

Shekap Leader Death | शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, शेतकरी चळवळीतील लढवय्ये शिलेदार आणि गोदाकाठचा क्रांतिसिंह अशी ओळख असणारे भाई लक्ष्मणराव गोळेगावकर (वय ९५) यांचे मंगळवारी (दि. ६) रात्री ९ वाजता पुण्यातील हॉस्पिटलमध्ये निधन झाले.

पुढारी वृत्तसेवा

परभणी, पुढारी वृत्तसेवा :

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, शेतकरी चळवळीतील लढवय्ये शिलेदार आणि गोदाकाठचा क्रांतिसिंह अशी ओळख असणारे भाई लक्ष्मणराव गोळेगावकर (वय ९५) यांचे मंगळवारी (दि. ६) रात्री ९ वाजता पुण्यातील हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या पश्चात सून, विवाहित कन्या, जावई, पुतणे, नातवंडे असा मोठा संयुक्त परिवार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाई लक्ष्मणराव गोळेगावकर हे आजारी होते. पुणे येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.

बुधवारी (दि. ७) सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत गंगाखेड येथील राहत्या घरी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार असून, दुपारी १ ते सायंकाळी ५ या वेळेत ममता उच्च माध्यमिक विद्यालय, पालम येथे अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे.

भाई लक्ष्मणराव गोळेगावकर यांच्या निधनाने जिल्ह्यात सहा दशके शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा अंत झाला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील जिल्ह्यातील बहुतांश लढ्यांचे नेतृत्व त्यांनी केले होते. आयुष्यभर शेतकरी कामगार पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या भाई गोळेगावकर यांनी मराठवाडा केसरी भाई अण्णासाहेब गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षात आपल्या कारकीर्दीला प्रारंभ केला.

पुढे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस व राज्याचे खजिनदार अशा जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते दीर्घकाळ संचालक व उपाध्यक्ष होते. ग्रामीण भागात शिक्षणाची चळवळ रुजावी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी त्यांनी बळीराजा शिक्षण संस्थेची स्थापना केली.

आज या शिक्षण संस्थेचा मोठा विस्तार झाला असून, हजारो विद्यार्थी संस्थेच्या विविध शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत आणि शेकडो शिक्षक या संस्थेत कार्यरत आहेत. अत्यंत परखड शैलीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या भाई गोळेगावकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवताना कधीही तडजोड केली नाही. त्या काळातील प्रस्थापित राजकीय सत्ता व प्रशासनाशी त्यांनी कायम संघर्षाची भूमिका घेतली. ‘राष्ट्रीयरत्न’ या उपाधीने त्यांना गौरविण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT