

Bardez Fire Incidents
म्हापसा : हडफडे येथील नाईट क्लबला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच बार्देश तालुक्यात मंगळवारी (दि.६) पहाटे पुन्हा अग्नितांडव घडले. दोन ठिकाणी लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले.
पर्वरीतील ‘घरान’ रेस्टॉरंट भीषण आगीत जळून भस्मसात झाले, तर नायकावाडा, कळंगुट येथील बांधकाम सुरू असलेल्या सागा हॉटेलच्या गोदामाला आग लागून लाखो रुपयांचे साहित्य खाक झाले. घरान रेस्टॉरंटच्या आगीच्या दुर्घटनेमागे घातपात असल्याचा अंदाज वर्तवला जात असून; दोन्ही घटनांमध्ये सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही.
मंगळवारी पहाटे 4.28 च्या सुमारास घरान रेस्टॉरंटला आग लागली. याबाबतची माहिती मिळताच पर्वरी, पणजी, पिळर्ण अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत तासाभराने आगीवर नियंत्रण मिळवले. तोपर्यंत सर्व रेस्टॉरंट जुळून खाक झाले होते. या रेस्टॉरंटचे बांधकाम लाकडी तसेच माडाची झावळे वापरून केले होते. त्यामुळे आग लगेच भडकली.
प्रसंगावधान राखून अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्टॉरंटच्या आवारातील 11 गॅस सिलिंडर बाहेर काढल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दुर्घटनेमध्ये अंदाजे 45 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, तर अग्निशमन दलाने 30 लाखांची मालमत्ता वाचवली आहे.
नायकावाडा, कळंगुट येथील बांधकाम सुरू असलेल्या सागा हॉटेल इमारतीमधील गोदामाला आग लागली. ही दुर्घटना सकाळी 6.50 च्या दरम्यान घडली. सहा मजली हॉटेल इमारतीच्या तळमजल्यावरील गोदामाच्या खोलीमध्ये पेंट आणि इतर साहित्य ठेवले होते. या साहित्याला अचानक आग लागली व ते सर्व साहित्य जळून भस्मसात झाले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे स्टेशन अधिकारी दामोदर पेडणेकर यांच्या नेतृत्वाखालील पिळर्ण, पर्वरी व म्हापसा अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत सर्व साहित्य जळाले होते. ही दुर्घटना शॉर्ट सर्किटमुळे घडल्याचा अंदाज आहे. घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन्ही घटनांचा पंचनामा पर्वरी व कळंगुट पोलिसांनी केला. पुढील तपास सुरू आहे.