सेलूत 8.43 किलो गांजा जप्त; एकावर गुन्हा File Photo
परभणी

Selu ganja seizure : सेलूत 8.43 किलो गांजा जप्त; एकावर गुन्हा

जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या कारवाईमुळे तस्करांत खळबळ

पुढारी वृत्तसेवा

परभणी : जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध व्यापारा विरोधात सुरू असलेल्या मोहिमेत पोलिसांना मोठे यश मिळाले. सेलू शहरातील राजीव गांधी नगर परिसरात छापा टाकून पोलिसांनी तब्बल 8 किलो 432 ग्रॅम गांजा जप्त केला, याप्रकरणी एका आरोपी विरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या आदेशानुसार बुधवारी (दि.28) जिल्ह्यात अवैध धंदे, अमली पदार्थ विक्री व तस्करी रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व सेलू ठाण्याचे पथक गस्त घालत होते. दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे सेलू येथील राजीव गांधी नगर परिसरात राहणाऱ्या शेख कौसर शेख अमीर (वय 60) यांच्या घरावर छापा टाकण्यात आला.

यावेळी त्या घराची झडती घेतली असता घरातून एकूण 8 किलो 432 ग्रॅम गांजा आढळला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे बाजार किंमत 1 लाख 68 हजार 640 रुपये इतकी आहे. सदर मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या कारवाई दरम्यान गटविकास अधिकारी उदय भोसले तसेच पोलिस निरीक्षक दीपक बोरसे उपस्थित होते.

याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार यांच्या फिर्यादीवरून सेलू पोलिस ठाण्यात शेख कौसर शेख अमीर यांच्याविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी गांजा कुठून आणत होता व त्याची विक्री कोणाला केली जात होती, याबाबत पोलिस तपास करीत आहेत.

सदर कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या आदेशान्वये तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. कारवाईत पोलिस उपनिरीक्षक गणेश पवार, अंमलदार विलास सातपुते, मधुकर ढवळे, उमेश चव्हाण, चाटे, दुबे, पोळ, हनवते तसेच महिला पोलिस कर्मचारी सारंग यांनी सहभाग घेतला.

जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या कारवाईमुळे तस्करांत खळबळ उडाली असून, पुढील काळात अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT