School Staffing Approval  AI Photo
परभणी

School Staffing Approval | ३० सप्टेंबरच्या विद्यार्थी पटावरच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संचमान्यता

आधारवैध विद्यार्थीसंख्येवर २०२६-२७ ची प्रक्रिया; विलंब झाल्यास संबंधित अधिकारी जबाबदार

पुढारी वृत्तसेवा

Education Directorate School Sanch Manya

परभणी : राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता ३० सप्टेंबर रोजी नोंद असलेल्या आणि आधारवैध विद्यार्थीसंख्येच्या आधारे करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण करून संचमान्यता निर्गमित करण्याचे नियोजन शिक्षण संचालनालयाने केले आहे. या प्रक्रियेसाठी कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने मुख्याध्यापकांसह शिक्षण विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेची धावपळ वाढली आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तसेच बृहन्मुंबईतील शिक्षण निरीक्षकांना याबाबत निर्देश दिले आहेत. यापूर्वी पत्र, ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि भ्रमणध्वनी संदेशाद्वारेही ३० सप्टेंबरची विद्यार्थीसंख्या संचमान्यतेसाठी आधारभूत राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

ऑनलाइन विद्यार्थी माहिती भरताना Division Aid, Medium, Stream, Inactive Division आणि Pen Null या बाबी अचूक असणे आवश्यक आहे. या नोंदींमध्ये त्रुटी राहिल्यास संबंधित शाळेची संचमान्यता ऑनलाइन प्रणालीवर तयार होण्यास अडथळा येऊ शकतो. एखाद्या शाळेतील काही विद्यार्थ्यांची माहिती योग्य, तर काहींची चुकीची असल्यास योग्य माहिती असलेले विद्यार्थीच संचमान्यतेसाठी ग्राह्य धरले जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे ३० सप्टेंबररोजी शाळेच्या नोंदवहीतील विद्यार्थी पट आणि ऑनलाइन प्रणालीवरील माहिती यामध्ये कोणतीही तफावत राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः आधारवैध विद्यार्थीसंख्येची पडताळणी करणे आवश्यक असल्याने मुख्याध्यापकांसमोर विद्यार्थी माहिती अचूक करण्याचे मोठे आव्हान आहे.

विलंबाची जबाबदारी निश्चित होणार

संचमान्यता प्रक्रियेत कोणत्याही स्तरावर हलगर्जीपणा होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने जबाबदारी निश्चित करण्याचा इशारा दिला आहे. संबंधित स्तरावरून विद्यार्थी माहिती सादर करण्यास विलंब झाला आणि त्यामुळे संचमान्यता तयार झाली नाही, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी विलंब करणाऱ्या स्तरावर निश्चित केली जाणार आहे.

त्यामुळे विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक या सर्वांनी तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. आपल्या स्तरावरून गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख आणि संबंधित मुख्याध्यापकांना तत्काळ निर्देश देण्याचे आदेशही शिक्षण संचालकांनी दिले आहेत.

शाळांची संचमान्यता शिक्षकांची पदसंख्या आणि उपलब्ध मनुष्यबळाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे ३० सप्टेंबरच्या विद्यार्थी पटाची अचूक नोंद आणि आधारवैध विद्यार्थीसंख्या यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ऑनलाइन प्रणालीतील किरकोळ त्रुटीचाही संचमान्यतेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शाळांनी अंतिम मुदतीपूर्वी सर्व नोंदी तपासणे आवश्यक आहे.

१ ऑक्टोबरला माहिती वर्ग करण्याचे निर्देश

शाळास्तरावरील विद्यार्थी माहितीची ३० सप्टेंबरपूर्वी काटेकोरपणे पडताळणी करून आवश्यक दुरुस्त्या पूर्ण कराव्यात. त्यानंतर १ ऑक्टोबर रोजी विद्यार्थी माहिती वर्ग करण्याची कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संचमान्यता निर्गमित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT