School News : आज शाळा गजबजणार, पुष्पगुच्छाने स्वागत file photo
परभणी

School News : आज शाळा गजबजणार, पुष्पगुच्छाने स्वागत

गुणवत्ता वाढीसह सोयीसुविधांच्या आढाव्यासाठी अधिकाऱ्यांच्या १०० शाळांना भेटी; विद्यार्थ्यांची रॅलीही निघणार

पुढारी वृत्तसेवा

Schools are reopening today; students will be welcomed with bouquets

परभणी, पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद शाळांकडे ओढा वाढविणे, शाळांची गुणवत्ता उंचावणे आणि शिक्षण व्यवस्थेला अधिक लोकाभिमुख बनविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठी मोहीम हाती घेतली. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना शाळांच्या दारी पोहोचण्याचे आदेश दिले. सोमवारी (दि. १५) शाळेची घंटा वाजणार असून या पहिल्याच दिवशी प्रत्येक अधिकाऱ्याने किमान एका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेला भेट देत विद्यार्थ्यांचे स्वागत करावे, शाळा गुणवत्ता व सुविधांचा आढावा घ्यावा आणि वर्षभरासाठी शाळा दत्तक घेत तिच्या विकासात योगदान द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिले.

राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णय अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या शाळा प्रवेशोत्सव उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांच्या विकासाला नवे बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे. शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता, विश्वास आणि जनसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, ग्रामपंचायती, शालेय समित्या व ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग असणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून उत्साहात स्वागत करत त्यांच्यात शिक्षणाविषयी आकर्षण निर्माण करण्याचा प्रयत्न होणार आहे.

यावेळी संबंधित अधिकारी विद्यार्थ्यांशी संवाद साधून शिक्षकांच्या अडचणी जाणून घेतील तसेच शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रमांचा प्रत्यक्ष आढावा घेतील. केवळ स्वागत समारंभापुरता हा उपक्रम मर्यादित नसून शाळेच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करण्याचा त्यामागील उद्देश आहे. विशेष म्हणजे, भेटी दरम्यान अधिकाऱ्यांनी शाळेतील पायाभूत सुविधांची सखोल तपासणी करावी, असे आदेशात स्पष्ट केले. वर्गखोल्यांची स्थिती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहांची उपलब्धता, विद्यार्थ्यांसाठी खेळाची साधने, शाळा परिसराची स्वच्छता, प्रधानमंत्री पोषणशक्त्ती योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराचा दर्जा, ग्रंथालय, डिजिटल शिक्षण सुविधा यांचा बारकाईने आढावा घेतला जाणार आहे.

धोकादायक अवस्थेतील इमारती, जीर्ण वर्गखोल्या, वापराअभावी बंद पडलेली शौचालये, अपुऱ्या सुविधा किंवा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला बाधा आणणाऱ्या बाबी आढळल्यास संबंधित यंत्रणांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देण्याचे अधिकारही अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे केवळ अहवाल तयार करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर दिला जाणार आहे. ग्रामीण भागातील अनेक पालक आजही खासगी शाळांकडे आकर्षित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळांबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करणे ही मोहिमेची प्रमुख गरज मानली जात आहे.

त्यामुळे अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधून जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश वाढविण्यासाठी प्रभावी उपाययोजना सुचविणार आहेत. राज्य शासनाने सुरू केलेल्या १००९ शाळांना भेटी या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या धर्तीवर जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या या अभियानामुळे शिक्षण व्यवस्थेतील अनेक प्रश्न प्रत्यक्ष पातळीवर समोर येणार असून त्यांच्या निराकरणालाही गती मिळणार आहे. शिक्षणाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांची उपस्थिती, पालकांचा विश्वास आणि शाळांची भौतिक उभारणीमध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

परभणी जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आदर्श आचारसंहिता लागू असल्याने या उपक्रमाची अंमलबजावणी करताना कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजयसिह चव्हाण यांनी दिले आहेत. शिक्षणाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना नवसंजीवनी देण्यासाठी प्रशासनाने उचललेले हे पाऊल ग्रामीण शिक्षण व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

शाळा प्रवेशोत्सवापूर्वी गावोगावी शाळांची स्वच्छता, पालकांच्या भेटी घेवून संवाद साधण्यात आला. तसेच मोफत पुस्तके व गणवेशांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी केले जाणार आहे. एवढेच नव्हे तर जिल्हा परिषद शाळांमध्ये कोणकोणत्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत याचीही माहिती समाजमाध्यमाद्वारे नागरीकांपर्यंत पोहचविली जात असल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्राथमिक सुनिल पोलास यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT