Rahul Patil Talika Sabhapati
परभणी : महाराष्ट्र विधानसभेच्या नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी परभणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (ठाकरे गट) आ.डॉ. राहुल पाटील यांची तालिका सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही घोषणा करताच परभणी जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वस्तरातून आ.पाटील यांचे अभिनंदन होत आहे.
आ.डॉ.राहुल पाटील हे परभणी मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले जेष्ठ व अभ्यासू विधिमंडळ सदस्य मानले जातात. सभागृहातील विविध महत्वाच्या विषयांवर ते सातत्याने अभ्यासपूर्ण, तथ्यपूर्ण आणि मुद्देसूद मांडणी करत असल्याने त्यांची विधिमंडळात विशिष्ट ओळख निर्माण झाली. शेतकरी प्रश्न, परभणीची विकासकामे, राज्यातील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी आजवर प्रभावी बाजू मांडली.
त्यांच्या या कामगिरीची दखल घेत त्यांची तालिका सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे मानले जात आहे. या नियुक्तीमुळे परभणी विधानसभेला प्रथमच तालिका सभापतीपदाचा मान मिळाला आहे. या पदावरून आ.पाटील संपूर्ण अधिवेशनात सभागृहाचे संचालन करण्यास अध्यक्षांना सहाय्य करतील.
मुख्य सभापतींच्या अनुपस्थितीत सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी ज्येष्ठ आणि अनुभवी सदस्यांची निवड तालिका सभापती म्हणून केली जाते. अधिवेशनातील दैनंदिन कामकाज कोणत्या क्रमाने घ्यायचे, नियमांची काटेकोर अंमलबजावणी होत आहे की नाही यावर लक्ष ठेवणे, तसेच पीठासीन अधिकारी म्हणून काम करणे या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या तालिका सभापतीकडे असतात.
सभागृहाचे कामकाज कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडावे, यासाठी त्यांचे योगदान निर्णायक ठरते. या सन्मानामुळे परभणीच्या राजकीय क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून स्थानिक कार्यकर्त्यांसह नागरिकांकडून आ.पाटील यांचे स्वागत करण्यात येत आहे.