Soybean Rate Today Parbhani
पूर्णा : पांगरा रोडवरील समर्थ कृषी बाजार मार्केटमध्ये पूर्णा तालुका खरेदी-विक्री संघाअंतर्गत शासकीय हमीदराने सोयाबीन खरेदीची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे. खरीप हंगाम २०२५ मधील नोंदणीकृत शेतकऱ्यांचे सोयाबीन नाफेड व फेडरेशन पणन संघाच्या मान्यतेनुसार शासकीय खरेदी केंद्रामार्फत खरेदी करण्यात येत आहे.
आतापर्यंत नोंदणी केलेल्या १,६४३ शेतकऱ्यांपैकी २२५ शेतकऱ्यांचे स्वच्छ व वाळलेले ३,९८६ क्विंटल ५० किलो सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे. शासकीय हमीदर प्रतिक्विंटल ५,३२८ रुपये या दराने संबंधित शेतकऱ्यांच्या डीबीटी लिंक बँक खात्यात एकूण १ कोटी ३४ लाख २९ हजार २२४ रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती संदीप घाटोळ व गजानन ढगे यांनी दिली.
पूर्णा तालुका खरेदी-विक्री संघाकडे सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत १,६४३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणीची अंतिम तारीख ३१ डिसेंबर असून इच्छुक शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीसाठी सातबारा उताऱ्यावर सोयाबीन पेरणीची नोंद असणे आवश्यक आहे.
यापूर्वी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना क्रमवारीनुसार संदेश पाठवून खरेदी केंद्रावर सोयाबीनची चाळणी व वजन करून खरेदी केली जात आहे. विक्रीसाठी आणलेले सोयाबीन वाळलेले, स्वच्छ आणि माती-दगडमुक्त असावे, भिजलेले किंवा डागी सोयाबीन आणू नये, असेही सूचित करण्यात आले आहे.
दरम्यान, यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. त्यातच सध्या बाजारात सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात घसरले असून प्रतिक्विंटल ४,२०० ते ४,५०० रुपयांदरम्यान खरेदी होत आहे. हा दर शासकीय हमीदरापेक्षा सुमारे ९०० रुपयांनी कमी आहे.
या परिस्थितीत शेतकऱ्यांनी शासकीय हमीदर केंद्रावर सोयाबीन विक्री करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांनी यापूर्वीच आडत्यांकडे सोयाबीन विकल्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे बाजारभाव आणि शासकीय हमीदरातील तफावतीपोटी शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.