

Mahadev Koli community protest
पूर्णा : अनुसूचित जमातीतील महादेव कोळी, मल्हार कोळी आणि टोकरे कोळी समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ गुरूवारी ( दि.१८ ) पूर्णा तहसील कार्यालयावर समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, १० डिसेंबर रोजी नागपूर येथे काढण्यात आलेल्या मोर्चाची आणि त्यानंतर झालेल्या चार दिवसांच्या आमरण उपोषणाची आदिवासी मंत्र्यांनी दखल घेतली नाही. उलट, पोलीस बळाचा वापर करून आंदोलकांना अमानवीय पद्धतीने तिथून हटवण्यात आले, असा आरोप समाज बांधवांनी केला आहे.
आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी असतानाही मंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ दिला नाही आणि केवळ फोटो काढण्यापुरते निवेदन स्वीकारले, असा आरोप आंदोलकांनी केला आहे. एकाच दिवशी आलेल्या दोन वेगवेगळ्या संघटनांच्या मोर्चांपैकी एकाला तात्काळ चर्चेसाठी बोलावले, मात्र महादेव कोळी समाजाच्या शिष्टमंडळाला जाणीवपूर्वक डावलले गेल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. जर मागण्यांची लवकर दखल घेऊन बैठक आयोजित केली नाही, तर २३ फेब्रुवारी २०२६ पासून मुंबईच्या आझाद मैदानावर तीव्र आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या मोर्चात रमेश विठ्ठलवाड, भगवान सोळंके, किशोर सूर्यवंशी, सतीश सुरवसे, मारोती जगताप यांसह मोठ्या संख्येने महिला व पुरुष समाज बांधव उपस्थित होते. रेणुकाबाई घोरपडे, देवकाबाई पानोडे, पूजा घोरपडे यांच्यासह शेकडो महिलांनी या आंदोलनात सहभाग नोंदवून सरकारचा निषेध केला.