Purna Panchayat Samiti Pudhari
परभणी

Purna Panchayat Samiti | पूर्णा पंचायत समितीत सत्ता स्थापनेसाठी उबाठा-अपक्षांची मोट; ७ पैकी ३ भाजप सदस्य गैरहजर राहणार?

Parbhani Politics | उबाठा शिवसेना आणि अपक्ष सदस्यांनी एकत्र येत सत्ता स्थापनेसाठी रणनीती

पुढारी वृत्तसेवा

UBT Shiv Sena Independent candidates alliance Purna

आनंद ढोणे

पूर्णा : पूर्णा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी मंगळवारी (दि. १०) दुपारी ३ वाजता पंचायत समिती सभागृहात निवड प्रक्रिया होणार आहे. मात्र या निवडीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याची चर्चा रंगली आहे. उबाठा शिवसेना आणि अपक्ष सदस्यांनी एकत्र येत सत्ता स्थापनेसाठी रणनीती आखल्याचे बोलले जात आहे.

पंचायत समितीच्या निवडणुकीत एकूण १२ सदस्य निवडून आले होते. यात भाजपाचे ४, यशवंत सेना २, राष्ट्रवादी १, उबाठा शिवसेना ३ आणि अपक्ष २ सदस्यांचा समावेश होता. बहुमतासाठी ७ सदस्यांची आवश्यकता असताना आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या पुढाकाराने यशवंत सेनेचे २ आणि राष्ट्रवादीचा १ सदस्य भाजपमध्ये दाखल झाल्याने भाजपाकडे ७ सदस्यांचे स्पष्ट बहुमत असल्याचे चित्र होते. त्यामुळे पंचायत समितीत भाजपाची सत्ता स्थापन होणे जवळपास निश्चित मानले जात होते.

मात्र, काही दिवसांतच राजकीय समीकरणे बदलू लागली. भाजपाची सत्ता रोखण्यासाठी उबाठा शिवसेनेचे ३ आणि अपक्ष २ असे एकूण ५ सदस्य खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आल्याची माहिती समोर आली. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी या गटाने सत्ताधारी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधत भाजपाच्या सात सदस्यांपैकी वझूर गटातील एक सदस्य वगळता तीन सदस्यांना आपल्या बाजूला वळवण्यात यश मिळवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

यामुळे मंगळवारी होणाऱ्या निवडणुकीत अपक्ष सदस्य सभापती आणि उबाठा शिवसेनेचा सदस्य उपसभापती म्हणून निवडून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच भाजपाचे तीन सदस्य आजारपण किंवा इतर कारणे देत निवड प्रक्रियेला अनुपस्थित राहू शकतात, अशीही चर्चा आहे.

असे घडल्यास सभागृहात एका बाजूला उबाठा शिवसेनेचे ३ आणि अपक्ष २ असे ५ सदस्य उपस्थित राहतील, तर दुसऱ्या बाजूला भाजपाचे केवळ ४ सदस्य उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बहुमताच्या बळावर उबाठा-अपक्ष गट पंचायत समितीत सत्ता स्थापन करू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

आमदारांना शह देण्यासाठी रणनीती?
दरम्यान, पंचायत समितीत भाजपाकडे स्पष्ट बहुमत असतानाही विरोधकांनी वेगळी राजकीय चाल खेळल्याची चर्चा रंगली आहे. विद्यमान आमदारांना राजकीय शह देण्यासाठीच भाजपातील काही सदस्यांना वेगळ्या गटाकडे वळवण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपाचे संख्याबळ कमी होऊन सत्ता स्थापनेचा मार्ग विरोधकांसाठी मोकळा झाल्याचे सांगितले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर अपक्ष सदस्य उज्ज्वला नारायण पिसाळ या सभापती, तर उबाठा शिवसेनेचे काशिनाथ काळबांडे हे उपसभापती म्हणून निवडले जाण्याची शक्यता असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून दिली जात आहे. तसेच या घडामोडींमध्ये मोठ्या आर्थिक व्यवहाराची शक्यताही राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

भाजपा जिल्हाध्यक्षांकडून पंचायत समिती सदस्यांना व्हिप जारी

पूर्णा पंचायत समितीत १० मार्च रोजी होणाऱ्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने पक्षशिस्तीचा इशारा देत व्हिप जारी केला आहे.भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी भाजपा महायुतीच्या पूर्णा पंचायत समितीतील पक्षप्रतोद प्रभावती दिनानाथ दुधाटे आणि गटनेते ज्ञानोबा घोडके यांना याबाबत अधिकृत पत्र पाठवले आहे. या पत्रात १० मार्च रोजी होणाऱ्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीसंदर्भात पक्षाचा निर्णय कळवण्यात आला आहे.

पत्रानुसार, सभापती पदासाठी गिरी विलास बळीराम यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली असून उपसभापती पदासाठी प्रभावती दिनानाथ दुधाटे यांना अधिकृत उमेदवार घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपा महायुती गटातील सर्व सदस्यांनी या उमेदवारांनाच मतदान करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच गटप्रतोद या नात्याने प्रभावती दुधाटे यांनी गटातील सर्व सदस्यांना तात्काळ व्हिप जारी करून त्याची लेखी माहिती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, पक्षाच्या निर्णयाचे पालन करणे सर्व सदस्यांसाठी अनिवार्य राहील, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास पक्षशिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. तसेच पक्षविरोधी मतदान केल्यास संबंधित सदस्यांचे सदस्यत्व तात्काळ रद्द करण्याचीही तरतूद असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

याच अनुषंगाने पक्षप्रतोद प्रभावती दुधाटे यांनीही भाजपा गटातील सर्व सदस्यांना व्हिप बजावल्याची माहिती देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT