Purna Municipal Election
पूर्णा : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी दिलेल्या शब्दाप्रमाणे पूर्णा शहराचा सर्वांगीण विकास केला जाईल, सत्ता मिळाल्याने हुरळून न जाता, सर्वांना सोबत घेऊन शहराच्या विकासासाठी काम केले जाईल. पराभूत झालेल्या उमेदवारांनी खचून जाऊ नये, त्यांनाही विकास प्रक्रियेत सामावून घेतले जाईल. विकासासाठी निवडून आलेल्या अपक्ष नगरसेवकांसाठी आमची दारे सदैव खुली असतील, असे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे म्हणाले.
नगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, सुजाण मतदारांनी बंटी ऊर्फ नितीन कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नगराध्यक्ष विमलबाई कदम यांच्यासह यशवंत सेनेचे सात नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून दिले असून, जनतेच्या या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यापुढे शहराच्या विकासकामात राजकारण आणू नये, सर्वांनी एकदिलाने सहकार्य करावे, असे आवाहनही आ. गुट्टे यांनी केले.
यावेळी यशवंत सेनेचे विजयी उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी साहेबराव कल्याणकर यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास नगरपालिका निवडणुकीतील किंगमेकर व मित्रमंडळाचे नेते नितीन कदम, नगरसेवक राजेश भालेराव, मिरा विश्वनाथ होळकर, मुकुंद भोळे, मुजीब अब्दुल, भोसले कौशल्य, सुनील जाधव, कांबळे अर्चना, माजी नगरसेवक सुधाकर खराटे यांच्यासह मित्रमंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.