

Parbhani land purchase dispute
ताडकळस : सतत दारू पाजून नशेत असताना जमिनीचे खरेदीखत करून घेतल्याच्या धक्क्यातून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ताडकळस येथे घडली आहे. याप्रकरणी मृताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
मृताची पत्नी आशा मारोती दळवी (वय ३४) यांनी याप्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीवरून तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुख्य आरोपी चंद्रकांत सोनटक्के याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ताडकळस येथील रहिवासी मारोती किशनराव दळवी (वय ३७) यांना आरोपी चंद्रकांत भीमराव सोनटक्के, ज्ञानेश्वर किशनराव आंबोरे आणि अंगद भीमराव सोनटक्के हे गेल्या काही दिवसांपासून जाणीवपूर्वक अतिप्रमाणात दारू पाजत असत. मारोती यांची जमीन हडपण्याच्या उद्देशाने या तिघांनी त्यांना शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून मारोती यांना दारूच्या नशेत ठेवले आणि जमिनीचा कोणताही मोबदला न देता त्याचे खरेदीखत स्वतःच्या नावावर करून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मारोती हे प्रचंड मानसिक तणावात होते. याच तणावातून त्यांनी १८ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली.
ठाणेदार गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश तावडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.