पूर्णा : शहरातील महावीर नगर परिसरातील इंडेन गॅस एजन्सीचा अनागोंदी कारभार सध्या चव्हाट्यावर आला आहे. गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना आठ-आठ दिवसांपासून रांगेत उभे राहावे लागत असून, बुकिंग करूनही वेळेत पुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
रिफिल मेसेजचा पत्ता नाही
गॅस बुकिंगसाठी अधिकृत क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर नोंदणीचा मेसेज येतो, मात्र त्यानंतर रिफिल संदर्भात कोणताही पुढील संदेश येत नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. 10 ते 12 दिवस उलटूनही सिलिंडर मिळत नसल्याने नागरिकांना दररोज एजन्सीवर जाऊन चौकशी करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. गॅस पुरवठा उशिरा होण्यामागे युद्धजन्य परिस्थितीचे कारण पुढे केले जात असले, तरी एजन्सीकडून मिळणाऱ्या परस्परविरोधी माहितीमुळे ग्राहकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
घरगुती महिलांसह व्यावसायिकांचे हाल
वेळेत गॅस मिळत नसल्याने गृहिणींसमोर स्वयंपाकाचा प्रश्न उभा ठाकला आहे. दुसरीकडे, हॉटेल आणि खानावळ व्यावसायिकांनी पर्याय म्हणून पुन्हा लाकडी इंधनाचा वापर सुरू केला आहे. यातच शासनाने घरगुती सिलिंडरमध्ये 60 रुपये, तर व्यावसायिक सिलिंडरमध्ये 115 रुपयांची दरवाढ केल्याने ग्राहकांच्या अडचणीत दुहेरी भर पडली आहे. महागाईचा फटका सहन करत असतानाच वेळेत गॅस न मिळणे, ही मोठी समस्या बनली आहे.
मी 12 दिवसांपूर्वी गॅस बुकिंग केले आहे, मात्र अद्याप रिफिलचा मेसेज आलेला नाही. गॅस संपल्याने घरात स्वयंपाक करणे कठीण झाले असून, रोज एजन्सीच्या चकरा माराव्या लागत आहेत.उमेश झरकर, ग्राहक, पूर्णा.