पूर्णा नगरपरिषद निवडणूक 2025 साठीचा प्रचार आणि तयारी जोरात सुरू झाली असून शहरात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीही काटेकोरपणे केली जात आहे. निवडणूक काळात पैशांचे व्यवहार, मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रकार आणि बेकायदेशीर हालचाली रोखण्यासाठी शहरात विविध ठिकाणी सतत तपासणी पथके तैनात आहेत. अशाच एका चेकपोस्ट पथकाने सोमवारी सकाळी केलेल्या कारवाईत तब्बल ३० लाख रुपये रोकड जप्त केल्याने पूर्णा शहरात एकच खळबळ माजली आहे.
हे प्रकरण शहरातील राजमुद्रा चौकातील निवडणूक चेकपोस्टवर घडले. निवडणूक अधिकारी नारायण मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील कर्मचारी 18 नोव्हेंबर रोजी सकाळी वाहनांची नियमित तपासणी करत होते. एमएच 26 बीएक्स 6596 ही कार शहराकडे येताना संशय आल्याने पथकाने ती थांबवून तपासणी सुरू केली. कारच्या डिक्कीत असलेल्या एका पिशवीत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळल्याने अधिकारीही काही क्षण अचंबित झाले.
तपासणी केली असता त्यामध्ये ३० लाख रुपयांची नकद रक्कम आढळून आली. निवडणूक काळातील ही मोठी रोकड पाहून पथकाने तातडीने पंचनामा सुरू केला. अधिकारी शिवानंद लेंडाळे, सदानंद राठोड, भोसले तसेच पोलिस कर्मचारी सुरेश मुंढे आणि बळवंते यांनी रोख रक्कम, वाहन आणि परिसराचा तपशीलवार पंचनामा करत फोटो व व्हिडिओद्वारे संपूर्ण प्रक्रिया नोंदवली.
नंतर ही रोकड निवडणूक पथकाने तहसील कार्यालयातील ट्रेझरी कक्षात जमा केली. निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसीलदार माधवराव बोथीकर यांनी याबाबतची माहिती देताना सांगितले की,
“या रोकडीचा मालक कोण? ही रक्कम कुठून आली आणि कुठे नेली जात होती? याचा सविस्तर तपास वरिष्ठ अधिकारी करतील.”
कारवाईवेळी ना. प्रशांत थारकर, उविपोअ डॉ. समाधान पाटील आणि पोनि विलास गोबाडे हे अधिकारीही उपस्थित होते. या रोकडीबद्दल कारमालक किंवा गाडीत असलेल्या व्यक्तींनी कोणताही स्पष्ट purava न दिल्याने ती तत्काळ जप्त करण्यात आली.
निवडणुकीच्या काळात एवढी मोठी रक्कम फिरत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. आदर्श आचारसंहितेत कोणत्याही प्रकारे मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैसे किंवा भेटवस्तू देणे कठोरपणे बंद आहे. त्यामुळे या ३० लाख रुपयांचा उपयोग कोणत्या उद्देशासाठी होणार होता, याबाबत नागरिकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.
शहरात अनेक ठिकाणी चर्चा आहेत की,
“ही रक्कम निवडणुकीसाठीच वापरली जाणार होती का? कोणत्या उमेदवाराशी याचा संबंध आहे?” या प्रश्नांची अचूक उत्तरे तपासानंतरच मिळणार आहेत. तहसीलदार बोथीकर यांनी मात्र स्पष्ट केले की,
“निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार संशयित रोकड आढळल्यास ती तात्काळ जप्त करून तपास सुरू करावा लागतो. त्यानुसार सर्व प्रक्रिया पार पाडली असून आता या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ अधिकारी करतील.” या घटनेमुळे पूर्णा शहरातील राजकीय वातावरण आणखी तापले असून मतदारही प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे उत्सुकतेने पाहत आहेत.