

कोल्हापूरातील पुलाची शिरोली परिसरात मंगळवार रात्री थरारक घटना घडली. पूर्ववैमनस्यातून टोळक्याने दांपत्यासह त्यांच्या 11 वर्षांच्या मुलावर ऐडक्याने भयानक हल्ला केला. या हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून मुलगा थोडक्यात मृत्यूच्या दाढेतून बचावला. हल्ल्यानंतर संशयित आरोपी वैभव बेडेकर घटनास्थळावरून फरार झाला असून शिरोली पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
ही घटना रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास सब्र मल्टी ऑनलाईन सर्व्हिसेस दुकानाजवळ घडली. दिगंबर रघुनाथ कांबळे (४०), आरती दिगंबर कांबळे (३५) आणि मुलगा वल्लभ (११) हे तिघेही जेवणानंतर शतपावली करत रस्त्यालगत फिरत होते. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या आरोपी वैभव बेडेकर आणि त्याच्या काही साथीदारांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.
हल्ल्यादरम्यान वैभव बेडेकरने हातातील ऐडक्याने दिगंबर कांबळे यांच्या डोक्यावर आणि हातावर जोरदार वार केले. या वारांमध्ये दिगंबर यांच्या हाताचे बोट तुटल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पत्नी आरती कांबळेही हल्ल्यात गंभीर जखमी झाली. मुलगा वल्लभ याच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न झाला, मात्र तो सुदैवाने थोडक्यात बचावला.
हल्ला झाल्यानंतर परिसरात एकच धावपळ उडाली. स्थानिकांनी तात्काळ शिरोली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी वैभव बेडेकर आणि त्याचे साथीदार अंधाराचा फायदा घेत पळून गेले.
या प्रकरणी पोलिसांनी गंभीर गुन्हा दाखल केला असून वैभव बेडेकर व त्याच्या टोळक्याचा सर्वत्र शोध सुरू आहे. हल्ल्यामागील कारण पूर्वीपासून सुरु असलेले वैमनस्य असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. पोलिसांनी नागरीकांनी घाबरून न जाता चौकशीस सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
दिगंबर आणि आरती कांबळे यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. दोघांची परिस्थिती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेमुळे पुलाची शिरोली परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.
पोलिसांनी हल्ला करण्यासाठी वापरलेले शस्त्र आणि आरोपींच्या हालचालींबाबतची माहिती गोळा करण्यासाठी तपासाची गती वाढवली आहे. सीसीटीव्ही फुटेज, स्थानिकांकडून मिळणारी माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला जात आहे.