पूर्णा : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महावीर नगर परिसरात १९ ऑगस्टच्या मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत ज्वेलर्स दुकानासह काही ऑनलाइन सेवा केंद्रे फोडली. या चोरीत सोन्या-चांदीचे दागिने तसेच नगदी रक्कम लंपास करण्यात आली असून, चोरट्यांची संपूर्ण हालचाल सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
२० ऑगस्ट रोजी सकाळी दुकानमालकांना चोरीची घटना निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे, पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संबंधित दुकानमालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घटनास्थळी शटर तोडून दुकानात प्रवेश करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. चोरीचा तपास वेगाने करण्यासाठी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे यांनी दिली. या चोरीत सुमारे पावणेतीन लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास झाल्याचे समोर येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, महावीर नगरातील महाराष्ट्र बँक व मेडिकल दुकानांच्या परिसरात असलेल्या शिवा मल्टी सर्व्हिसेस ऑनलाइन सेवा सेंटरचे शटर फोडून गल्ल्यातील ३ हजार रुपये चोरून नेण्यात आले. त्यानंतर जवळच असलेल्या शिवदीप अप्पा मेनकुदळे यांच्या ऑनलाइन दुकानातून ७ हजार ८०० रुपयांची नगदी लंपास करण्यात आली. याच परिसरातील संतकृपा ज्वेलर्स दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी १ किलो चांदी आणि १ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरी करतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले असून, त्याच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे.
पूर्णा शहरात सातत्याने घरफोडी आणि दुकानफोडीच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त सुरू असतानाही चोरटे पोलिसांना गुंगारा देत चोरी करत असल्याने शहरात सराईत आणि पटाईत चोरट्यांची टोळी सक्रिय असल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत.
मागील काही दिवसांत पूर्णा शहरात चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यापूर्वी ७ ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यासमोरील परिसरात माजी नगराध्यक्ष स्व. सुभाषसिंह ठाकूर यांच्या घरात चोरी करून कपाटातील नगदी रक्कम पळवण्यात आली होती. तसेच २८ जुलै रोजी सिद्धार्थ नगरात शिवगंगा अहिरे यांच्या घरफोडीत साडेपाच कोटी रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास करण्यात आला होता. या दोन्ही घटनांमधील अज्ञात चोरट्यांचा पोलिसांकडून कसून तपास सुरू असला तरी अद्याप त्यांना अटक करण्यात यश आलेले नाही. शहरासह ग्रामीण भागातही चोरीच्या घटना वाढत असल्याने अज्ञात चोरट्यांना जेरबंद करणे हे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे.