पूर्णा : तालुक्यातील पांगरा रोडवरील समर्थ कृषी मार्केट येथे बारदाना (गोण्या) उपलब्ध नसल्यामुळे शासकीय हरभरा खरेदी केंद्र तब्बल 25 दिवसांपासून ठप्प पडली. परिणामी हमीभावावर हरभरा विक्रीसाठी नोंदणीतील शेकडो शेतकरी संतप्त झाले असून प्रशासनाच्या उदासीन कारभाराविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.
पूर्णा तालुका खरेदी-विक्री संघामार्फत दि.10 मार्चपासून शासकीय हमीदराने हरभरा खरेदी सुरू करण्यात आली. मात्र केवळ दोन दिवस पुरेल इतकाच बारदाना उपलब्ध झाल्यानंतर तो संपला आणि त्यानंतर अद्यापपर्यंत बारदाना पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे खरेदी प्रक्रिया पूर्णपणे बंद ठेवावी लागली.
दरम्यान, हरभरा उत्पादक शेतकरी खरेदी केंद्रावर वारंवार चकरा मारत असून त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बाजारात हरभऱ्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांची सर्वस्वी अपेक्षा हमीभावावरच आहे. मात्र केंद्र बंद असल्याने त्यांच्या आर्थिक अडचणीत अधिकच भर पडत आहे. या संदर्भात खरेदी-विक्री संघाचे चेअरमन बापूराव घाटोळ यांनी संबंधित विभागाकडे अनेकवेळा तोंडी तसेच लेखी निवेदने दिली.
याशिवाय पालकमंत्री मेघना बोर्डीकर, मार्केटिंग फेडरेशन मुंबईचे चेअरमन, जिल्हाधिकारी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडेही पत्रव्यवहार करून बारदाना तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. सद्यस्थितीत खरेदी केंद्रावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांचा आक्रोश वाढत आहे. केंद्रातील कर्मचाऱ्यांंचेही काम ठप्प असल्याने निघून जात आहेत, तर हमालांवर उपासमारीची वेळ आली.
या गंभीर परिस्थितीमुळे भविष्यात काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान यंदाच्या रब्बी हंगामात तालुक्यातील सुमारे 27 हजार 614 हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची लागवड करण्यात आली होती. अनुकूल हवामान आणि जमिनीत टिकून राहिलेल्या ओलाव्यामुळे हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शासकीय खरेदी केंद्रावर नोंदणी केली. परंतु बारदाना टंचाईमुळे ही संपूर्ण प्रक्रिया ठप्प झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर बारदाना तात्काळ उपलब्ध करून द्यावा, अन्यथा दि.6 एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा चेअरमन बापूराव घाटोळ यांनी दिला आहे.