Parbhani news | पूर्णेत बारदान पोत्या अभावी शासकीय हरबरा खरेदी बंद

खरेदी विक्री संघ चेअरमनचा उपोषणाचा इशारा
Parbhani news
Parbhani news
Published on
Updated on

पूर्णा: पांगरा रोडवरील समर्थ कृषी मार्केटमध्ये सुरू असलेले हरभरा खरेदी केंद्र गेल्या २५ दिवसांपासून 'बारदाना' उपलब्ध नसल्यामुळे बंद पडले आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने, पूर्णा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन बापूराव घाटोळ यांनी आता ६ एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

नेमके प्रकरण काय?

शासकीय हमीदराने हरभरा खरेदी करण्यासाठी १० मार्च रोजी हे केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र, अवघ्या दोनच दिवसांत बारदाना संपला. तेव्हापासून आजपर्यंत नवीन बारदाना पुरवण्यात न आल्याने खरेदी प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. चेअरमन घाटोळ यांनी मार्केटिंग फेडरेशन (मुंबई), जिल्हाधिकारी, डीडीआर आणि डीएमओ यांच्याकडे लेखी व तोंडी स्वरूपात अनेकदा पाठपुरावा केला. ३ एप्रिल रोजी पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनाही पत्राद्वारे या समस्येची दखल घेऊन तात्काळ बारदाना उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांचा संताप आणि कर्मचाऱ्यांची पळापळ

हवामान पोषक असल्याने यंदा तालुक्यात २७,६१४ हेक्टरवर हरभऱ्याची विक्रमी पेरणी झाली असून उत्पादनही मोठ्या प्रमाणात झाले आहे. बाजारपेठेत भाव कमी असल्याने शेतकऱ्यांची भिस्त केवळ हमीभाव केंद्रावर आहे. मात्र, केंद्र बंद असल्याने:

  • नोंदणीकृत शेतकरी केंद्रावर फेऱ्या मारून त्रस्त झाले आहेत.

  • शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे केंद्रावरील कर्मचारी कामावरून निघून जात आहेत.

  • प्रशासनाने दखल न घेतल्यास शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.

"वरिष्ठ कार्यालयाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही. शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने, नाईलाजास्तव आम्हाला उपोषणाचे पाऊल उचलावे लागत आहे."

— बापूराव घाटोळ (चेअरमन, पूर्णा ता. खरेदी-विक्री संघ)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news