परभणी

टपाल जीवन विमा ठरला 'कुटुंबाचा आधार'; मृत विमाधारकाच्या पत्नीला २४ लाखांच्या धनादेशाचे वाटप

या प्रसंगी टपाल विभागातर्फे योजनेच्या फायद्यांची माहिती देत नागरिकांना आवाहन करण्यात आले

पुढारी वृत्तसेवा

जिंतूर: भविष्यातील अनपेक्षित संकटात भारतीय टपाल विभागाची 'डाक जीवन विमा योजना' (PLI) कुटुंबासाठी कशी खंबीर आधार ठरू शकते, याचा प्रत्यय जिंतूरमध्ये आला आहे. येथील उपविभाग अंतर्गत टपाल जीवन विमा कवच घेतलेल्या एका दिवंगत विमाधारकाच्या वारसदार पत्नीला २४ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या धनादेशाचे सन्मानपूर्वक वाटप करण्यात आले.

मंठा (जि. जालना) येथील रहिवासी असलेले सचिन राठोड यांनी तीन वर्षांपूर्वी २० लाख रुपयांचा डाक जीवन विमा (PLI) घेतला होता. काही दिवसांपूर्वी त्यांचे आकस्मिक निधन झाले. कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या जाण्याने राठोड परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, त्यांनी काढलेल्या टपाल विम्यामुळे त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती सविता सचिन राठोड यांना २४ लाख ४ हजार ४५३ रुपयांचे विमा कवच मंजूर झाले. दिनांक ८ जून रोजी जिंतूर उपविभागीय निरीक्षक बाळासाहेब आर. शिंदे यांच्या हस्ते हा धनादेश सविता राठोड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि सहकार्य

राठोड यांच्या वारसाला हा विमा दावा अत्यंत वेगाने आणि विनासायास मिळवून देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर क्षेत्राचे डाक निर्देशक मा. अजिंक्य काळे (IPoS) आणि परभणी विभागाचे डाक अधीक्षक संजय आंबेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच परभणीचे पोस्टमास्तर प्रकाश रुद्रावार आणि विकास अधिकारी सचिन कदम यांनी या प्रक्रियेत विशेष सहकार्य केले.

कमी हप्ता, जास्त बोनस; 'डाक जीवन विमा' योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

या प्रसंगी टपाल विभागातर्फे योजनेच्या फायद्यांची माहिती देत नागरिकांना आवाहन करण्यात आले. भारतीय डाक विभागाची डाक जीवन विमा योजना (PLI) आता केवळ कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित नसून, डिप्लोमाधारक आणि कोणत्याही शाखेच्या पदवीधरांसाठीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

  • कमी हप्ता आणि जास्त बोनस: इतर विम्याच्या तुलनेत यात कमी प्रीमियममध्ये अधिक बोनस मिळतो.

  • १००% सुरक्षितता: ही योजना भारताचे महामहिम राष्ट्रपती यांच्याद्वारे संचालित असल्याने पूर्णपणे सुरक्षित आहे.

  • कर सवलत: आयकर कलम ८० सी (80C) अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो.

  • विमा मर्यादा: या योजनेचा लाभ ५० लाख रुपयांपर्यंत घेता येतो.

  • इतर सुविधा: पासबुक सुविधेसह यावर कर्ज सुविधाही उपलब्ध आहे.

भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये पी.एल.आय. (PLI) व आर.पी.एल.आय. (RPLI) पॉलिसी काढता येऊ शकते आणि त्याचे पैसेही भरता येतात. तरी सर्व नागरिकांनी या सुरक्षित व फायदेशीर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परभणी डाक विभागाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT