Police raid on sand smuggling traffic in Purna, seized 15 lakh worth of goods including 3 tippers
पूर्णा, पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून विनापरवाना अवैध उत्खनन करुन रेतीची तस्करी करणारे तीन टिप्पर स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस पथकाने पकडले आहेत. या घटना तीन दिवसात घडल्या आहेत. अवैध गौण खनिज उत्खनन करुन त्याची वाहतूक करणारी वाहने पकडण्यासाठी स्थानिक पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सक्रिय झाले असताना महसूल खाते मात्र कमालीचे थंडावल्याचे दिसून येत आहे.
असे असताना १६ व १७ मे दरम्यान पूर्णा पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांनी संयुक्तपणे छापेमारी करत पिंपळगाव बाळापूर, पूर्णा, कानडखेड नदीपात्रानजीक शिवारात विनापरवाना वाळुची वाहतूक करणारे ३ टिप्पर पकडून त्यासह सुमारे १५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यात, टिप्पर क्रमांक एम एच २० ए टी ०९०२,एम एच ०४ ई एल ६६७३, एम एच २४ एफ ७२६४ हे वाळू भरलेले टिप्पर पकडण्यात आले. त्याच्या चालक आणि मालका विरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विलास गोबाडे, पोलिस उप निरीक्षक सोमनाथ शिंदे, चंदनसिंह परिहार, पोलिस उप निरीक्षक वाल्मिक भोसले, पोलिस हेड रंगनाथ दुधाटे, हनुमान ढगे, सचिन भदरगे, श्याम कुरील, गजानन क्षीरसागर, मुंडे, माधव अकलवाड यांच्यासह आदींनी फत्ते केली. पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत.
दरम्यान, पूर्णा व गोदावरी नदीपात्रातून मागील अनेक दिवसांपासून विनापरवाना वाळूचे उत्खनन होत आहे. उपसलेली वाळू टिप्पर व्दारे वाहतूक लोकेशनवर माणस ठेवून होत आहे. असे रात्रीच्या वेळी चोरट्या पद्धतीने अवैध रेती तस्करीचे प्रकार चालू असताना त्यावर महसूल अधिकाऱ्यांचा कानाडोळा होताना स्पष्ट होत आहे.
असे असताना स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिस अधिकारी मात्र ॲक्शन मोडवर येवून वाळूची बिना रॉयल्टी अवैध वाहतूक करताना वाहने पकडताहेत. तर या उलट महसूल अधिकारी मात्र सुस्तच दिसून येत आहेत. फक्त अधूनमधून कधीतरी एखाद दोन वाहने वाळूउपसा क्रेन पकडून कार्यवाहीचा पोर्टोकॉल पूर्ण करत असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.