

2 animals died due to lightning strike in Purna taluka
परभणी : आनंद ढोणे
पूर्णा: तालुक्यातील काही भागात १७ मे (शनिवार) रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला. अकाशात विजेचा कडकडाटही जोरदार चालू होता. अशात दोन ठिकाणी वीज कोसळून जनावरे दगावली. त्यातच आहेरवाडी येथे एका लग्न सोहळ्याचा उभारलेला मंडपही उडून गेला. त्यामुळे एकच तारांबळ उडाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालूक्यात शनिवारी रोजी सायंकाळी अचानक नभ दाटून येत वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सोबतच लक्ष्मीनगर, इस्माईलपूर येथे विजाही पडल्या. यात, लक्ष्मीनगर येथे गट क्रमांक ०१ मध्ये लिंबाच्या झाडावर वीज पडून खाली बांधलेली गंगाधर आळसे यांची गाभण गाय दगावली. त्यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. तसेच, इस्माईलपूर येथे वीज पडून सुधाकर माघाडे बैलगोरा दगावला. या घटनेत त्यांचे नुकसान झाले.
दरम्यान, आहेरवाडी येथे १७ मे रोजी सुभाष दत्तराव मोरे यांच्या मुलीचा लग्न सोहळा आयोजित केला होता. विवाह सोहळ्यासाठी दुपारपासूनच भोजन पंक्ती चालू झाल्या होत्या. यातच सायंकाळी ५ वाजेदरम्यान वादळीवाऱ्यासह वीजा कडकडून पाऊस आला.
या प्रसंगी लग्नासाठी उभा केलेला मंडपा वा-याने मोडून साफ झाला. त्यामुळे एकच तारांबळ उडाली. यावेळी वर-वधू पक्षाच्या लोकांची चांगलीच पळापळ झाली. लग्न सोहळा महादेव मंदिरात उरकावा लागला. अवकाळीने पाहुण्यांच्या जेवणाची त्रेधातिरपीट उडवली.
दरम्यान, तहसीलदार माधवराव बोथीकर, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, मंडळ अधिकारी के पी शिंदे, बालाजी लटपटे, तलाठी गणेश गोरे, अतूल कटके यांच्यासह महसूल कर्मचारी अवकाळीने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करत आहेत.