जिंतूर : जिंतूर तालुक्यातील पोखर्णी वनक्षेत्रमध्ये होत असलेल्या वृक्षतोड प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी प्रा.ह्युमन राईट्सचे विभागीय कार्याध्यक्ष प्रा.सुभाष राठोड यांनी एका निवेदनाद्वारे वन विभाग प्रादेशिक कार्यालयाच्या विभागीय वन अधिकारी यांच्याकडे गुरूवारी (दि.९) केली.
जिंतूर तालुक्यातील पोखर्णी वन क्षेत्रातून स्वयंचलित यंत्राच्या साहाय्याने हजारो हिरव्यागार वृक्षांची दिवसाढवळ्या कत्तल करून ट्रक द्वारे लाकडाची वाहतूक केली जात आहे. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता असताना अनधिकृत झाडे तोडण्यापासून रोखण्यासाठी एकही अधिकारी दखल घेत नाही आणि मुख्यालय राहत नाही. असे हे निवेदनात म्हटले आहे.
महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ च्या कलम २१ मधील तरतुदीनुसार प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणतेही झाड तोडणे किंवा तोडण्यासाठी कारणीभूत होणे हा अपराध असून या अपराधाकरिता शिक्षा केली जाते. जिंतूर तालुक्यासह जिल्ह्यात वन विभाग व लाकूड माफिया यांच्या संगणमताने नेहमी हिरव्यागार झाडांची कत्तल होत असताना वृक्षतोड थांबविण्याचे प्रयत्न मात्र कोणाकडूनही कोणत्याच पातळीवर केले जात नाही. स्वामिलची झाडाझडते ही कागदावरच असते ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही.
पर्यावरणीय दृष्टिकोनातून सुसंगत निर्णय घेण्यासाठी एक सक्षम अधिकारी म्हणून विभागीय वन अधिकारी हिंगोली यांनी वनसंपत्तीबरोबर वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येण्याअगोदर आपण जातीने लक्ष दिले पाहिजेत तसेच किती झाडे तोडण्यात आली. नियंत्रण राखण्यात अनियमितता झाली का? याची स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी करावी, असेही नमूद केले आहे.
पोखर्णी अवैध वृक्षतोड गंभीर प्रकरणात प्रादेशिक कार्यालयाचे वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल,वनरक्षक यांच्या अक्षम्य हयगय आणि अनास्थेमुळे वनसंपत्तीचे नुकसान होत आहे. हंगामी मजुरांच्या जीवावर जंगल वाचविण्याचे केविलवाना प्रयत्न जिल्हा ठिकाणी बसून अधिकारी/कर्मचारी करीत आहे. याचीही चौकशी करण्यात यावी, अशी ही मागणी ह्यूमन राइट्स विभागीय कार्याध्यक्ष प्रा.सुभाष राठोड यांनी केली.