67 हजारांवर विद्यार्थ्यांना मोफत गणवेशासह बूट, सॉक्स pudhari photo
परभणी

Parbhani ZP school uniform scheme : 67 हजारांवर विद्यार्थ्यांना मोफत गणवेशासह बूट, सॉक्स

राज्याच्या वित्त विभागाकडून केवळ 60 टक्केच निधी मंजूर, उर्वरित निधी मंजुरीकडे लक्ष; लवकरच नियोजन

पुढारी वृत्तसेवा

नरहरी चौधरी

परभणी : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1 हजार 121 शाळा असून त्याअंतर्गत पहिली ते आठवीपर्यंत प्रवेशीत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमातीतील मुले तसेच दारिद्य्ररेषेखालील पालकांची मुले अशा एकूण 67 हजार 212 विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत गणवेशासह बूट व सॉक्सचे वाटपचे नियोजन जि.प.शिक्षण विभागाकडून करण्यात आलेले आहे.

यातच राज्याच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने सोमवारी (दि.4) जिल्हा परिषदेने मागणी केलेला सर्व निधी मंजूर न करता केवळ 60 टक्केच निधीला मंजूरी दिली. यामुळे उर्वरित निधीला मंजुरी लवकर मिळावी अशी अपेक्षा असून या मंजूर निधीतून विद्यार्थी संख्या निश्चीतचे नियोजन लवकरच होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील पहिली ते आठवीत शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचीत जाती व जमातीतील मुले तसेच दारिद्य्ररेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणेश योजनेचा लाभ देण्यात येतो 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून प्रस्तूत योजनेचा लाभ दारिद्य्ररेषेखालील पालकांच्या मुलांनाही देण्याबाबतचा निर्णय दि.6 जुलै 2023 रोजी शासनाने घेतलेला आहे.

केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत गणवेश योजनेसाठी निर्धारीत केलेल्या प्रति गणवेश 300 रूपये याप्रमाणे राज्य शासनानेही दोन गणवेशासाठी 600 रूपये प्रति विद्यार्थी रक्कम निश्चीत केली आहे. एवढेच नव्हे तर दरवर्षी एक जोडी बुट, दोन जोडी पायमोजे यांचाही लाभ शालेय समितीमार्फत देण्यात येत आहे. याकरिता प्रति विद्यार्थी 170 रूपये इतकी रक्कम निश्चीत करण्यात आलेली आहे.

शासनाच्या मोफत गणवेश, बुट व पायमोजे योजनेंतर्गत राज्यातील पात्र विद्यार्थ्यांना गणवेश, बूट व पायमोजे उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत 140 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली होती. तथापि वित्त विभागाने सध्याच्या अर्थसंकल्पीय तरतुदीच्या 60 टक्के मर्यादेत म्हणजेच केवळ 84 कोटी इतकाच निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना सध्यातरी याचा लाभ मिळणार नसून उर्वरित निधी मिळाल्यानंतरच त्यांना योजनेचा खरा लाभ मिळू शकेल असे बोलले जात आहे.

तालुकानिहाय योजनेतील पात्र विद्यार्थी

केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत पहिली ते आठवतील सर्व मुली, अनुसूचित जाती व जमातीतील मुले तसेच दारिद्रयेरेषेखालील पालकांची मुले असे एकूण 67 हजार 212 विद्यार्थी मोफत गणवेश, बूट व सॉक्ससाठी पात्र आहेत. यामध्ये परभणी शहरातील 5 शाळांतील 151 विद्यार्थी, परभणी ग्रामीणमधून 161 शाळांतील 12 हजार 262, गंगाखेड तालुक्यातील 149 शाळांतून 7 हजार 573, जिंतूर 221 शाळांतील 11 हजार 717, मानवत 72 शाळांत 6 हजार 04, पालम 99 शाळांत 4 हजार 649, पाथरी 103 शाळांत 7 हजार 812, पूर्णा 112 शाळांत 7 हजार 97, सेलू 112 शाळांत 5 हजार 858 तर सोनपेठ तालुक्यातील 87 शाळांतील 4 हजार 89 विद्यार्थी पात्र आहेत. तसेच अन्य विद्यार्थ्यांना या योजनेप्रमाणेच लाभ देण्यात येतो पण त्यासाठी राज्य शासनाकडून वेगळी निधीची तरतूद करण्यात येते अशी माहिती शिक्षण विभागाने दिलेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT