परभणी: जिल्हा परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपने विसर्जित जिल्हा परिषदेमध्ये सत्ताधारी राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर तगडे आव्हान उभे केले असून राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये उमेदवार सुध्दा देता आलेले नाहीत.
विसर्जित जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. 24 सदस्य जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये पोहोचले होते. तत्कालीन सत्ताधारी राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसपुढे आज भाजपाने तगडे आव्हान उभे केले असून दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न चालवला आहे. पालकमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.राजेश विटेकर, माजी आ.विजय भांबळे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे.
काही दिवसापूर्वी पालकमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी आ.राजेश विटेकर यांचे होमपीच असलेल्या सोनपेठमध्ये जाऊन त्यांच्यावर बोचरी टीका केली होती. आ.विटेकर आणि पालकमंत्री बोर्डीकर यांच्यातील वाद सर्वश्रुत असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंतही एकमेकांच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. याच वादाच्या पार्श्वभूमीवर परभणी महानगरपालिका निवडणुकीत भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढली. जिल्हा परिषदेतही भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढत असून अनेक ठिकाणी या दोन प्रमुख पक्षांमध्ये काट्याची टक्कर होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व मदार आ.राजेश विटेकर, माजी आ.विजय भांबळे, माजी आ.डॉ.मधुसूदन केंद्रे या प्रमुख नेत्यांवर आहे. माजी आ.विजय भांबळे हे जिंतूर - सेलू विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची धुरा सांभाळू शकतात. डॉ.मधुसूदन केंद्रेही गंगाखेड तालुका अथवा गंगाखेड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सांभाळू शकतात. जिल्हाध्यक्ष या नात्याने आ.राजेश विटेकर यांच्यावर जिल्हा परिषद निवडणुकीची मोठी जबाबदारी असून मागील जिल्हा परिषदेत सत्ताधारी राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषदेच्या सर्वच गटात आजघडीला उमेदवार देता आलेले नाहीत.
जिल्हा परिषदेचे दहा गट असलेल्या परभणी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ आठ जागेवर उमेदवार उभे केले आहेत. पूर्णा तालुक्यातील सहा गटांपैकी काही गटांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार देता आलेले नाहीत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.
भारतीय जनता पक्षाने प्रथमच जिल्हा परिषदेच्या 49 गटांमध्ये आपले उमेदवार उभे केले असून पालकमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर, माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर, माजी आ.सुरेश वरपूडकर, आ.डॉ.रत्नाकर गुट्टे, भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे या प्रमुख नेत्यांवर भाजपाची जिल्हा परिषदेची जबाबदारी असणार आहे. जिंतूर तालुक्यासह मानवत, परभणी व अन्य तालुक्यांमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये काट्याची लढत होताना दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता निर्माण झालेली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसपुढे तगडे आव्हान उभे करत राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न चालवला आहे. ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या जिल्हा परिषदेत प्रवेश मिळवण्यासाठी प्रचंड स्पर्धा असून अनेक गटांमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकीच्या निमित्ताने प्रचार खालच्या पातळीवर पोहोचल्याचे पहावयास मिळत असून निवडणूक विकासाच्या मुद्यावर न लढता वैयक्तिक टीका टिप्पणीवर निवडणूक उतरल्याचे दिसत आहे.