परभणी

Parbhani storm weather update | वादळी वाऱ्याचा तडाखा : ताडकळस परिसरातील शेतकऱ्यांच्या सोलार पॅनलचे मोठे नुकसान

अनेक ठिकाणी वीज खांब कोसळले, तर मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे

पुढारी वृत्तसेवा

ताडकळस : पूर्णा तालुक्यातील ताडकळस परिसराला काल झालेल्या जोरदार वादळी वाऱ्याने अक्षरशः झोडपून काढले. ताडकळस, धानोरा काळे, मुबर, देऊळगाव दुधाटे, गोळेगाव, कळगाव, फुलकळस, खंडाळा, माखणी, खाबेगाव, कळगाववाडी, बानेगाव आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या शेतातील सोलार पॅनल उद्ध्वस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी वीज खांब कोसळले, तर मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ताडकळस परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनेंतर्गत उभारलेले सोलार प्रकल्प वादळी वाऱ्याच्या तडाख्यात मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झाले आहेत. लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या सोलार पॅनलचे पत्रे, स्टँड आणि उपकरणे तुटून पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. आधीच दुष्काळ, वाढते तापमान आणि शेतीमालाला मिळत नसलेला भाव यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांवर निसर्गाने आणखी एक घाव घातला आहे.

या नैसर्गिक आपत्तीत गोळेगाव येथील दिलीप विठ्ठलराव दुधाटे, खंडाळा येथील नामदेव दिगांबर शिंदे, सुनिता रमेश शिंदे, सचिन विठ्ठल शिंदे, श्रेयस लक्ष्मण शिंदे, लक्ष्मण भानुदास शिंदे, सारिका लक्ष्मण शिंदे, न्यानोबा नामदेव शिंदे, राम भानुदास शिंदे, दिगांबर धोंडीबा शिंदे, भागवत रमेश शिंदे, नाशिक लिंबाजी शिंदे, संतोष आत्माराम शिंदे, गंगाधर विठ्ठलराव शिंदे, विष्णू नरहरी शिंदे, माखणी येथील बालासाहेब बापुराव आवरगंड, भानुदास ज्ञानोबा शिंदे आणि रेखाबाई शेषेराव शिंदे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

वादळी वाऱ्यामुळे ताडकळस परीसरातील गावातील वीज वितरण व्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी वीज खांब जमिनीवर कोसळले असून वीजपुरवठा खंडित झाला आहे. उन्मळून पडलेल्या झाडांमुळे रस्ते अडवले गेले असून नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी ताडकळस परीसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

शासनाने तत्काळ मदतीचा हात दिला नाही तर आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते, अशी भावना परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. वादळ गेले, पण शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि नुकसानाची जखम कायम ठेवून गेले, अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT