Teacher Missing Parbhani Purna
पूर्णा : पूर्णा शहरातील एका प्राथमिक शाळेत गेल्या १४ वर्षांपासून कार्यरत असलेले ३६ वर्षीय शिक्षक राधाजी बालाजी रोडगे हे ३० ऑगस्टपासून बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, वेतनाबाबत संस्थाचालकांकडे विचारणा केल्यानंतर त्यांना ‘तुला गायब करून टाकतो’ अशी धमकी मिळाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या बेपत्ता होण्याबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त केला असून, चुडावा पोलिसांनी मिसिंगची नोंद करून शोध सुरू केला आहे.
राधाजी रोडगे हे पूर्णा शहरातील अनुसया माता प्राथमिक शाळेत मागील १४ वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मात्र, नियुक्ती झाल्यापासून त्यांना वेतन मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, नियुक्तीच्या वेळी संस्थेच्या व्यवस्थापनाला स्वतःची जमीन विकून १५ लाख रुपये डोनेशन दिल्याचेही नातेवाईकांनी सांगितले. दीर्घकाळ वेतन न मिळाल्याने रोडगे व त्यांचे कुटुंबीय आर्थिक अडचणीत असल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, २४ ऑगस्ट रोजी रोडगे यांनी संस्थाचालकांकडे आपल्या वेतनाबाबत विचारणा केली. त्यावेळी वेतन आणि सेवेसंदर्भात समाधानकारक उत्तर देण्याऐवजी संस्थाचालकांनी ‘तुला गायब करून टाकतो’, अशी धमकी दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. घरी आल्यानंतर रोडगे यांनी घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला होता.
त्यानंतर ३० ऑगस्ट रोजी रोडगे यांनी संस्थेचे अध्यक्ष भगवान देवराव पाटील यांची भेट घेतली. सायंकाळी चार वाजता घरी परत येतो, असे आईला सांगून ते घराबाहेर पडले. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या आई शिवकांताबाई बालाजी रोडगे यांनी नातेवाईकांना माहिती दिली.
नातेवाईकांनी रोडगे यांचा धा. टाकळी गाव, शेत परिसर, पूर्णा शहर तसेच रेल्वे स्थानक परिसरात शोध घेतला. मात्र, त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. रोडगे यांनी सोबत मोबाईलही नेला नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यांच्या बेपत्ता होण्याने पत्नी, आई, अपंग वडील आणि अन्य नातेवाईक चिंतेत आहेत.
वेतनाबाबत विचारणा केल्यानंतर संस्थाचालकांकडून धमकी मिळाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे असल्याने रोडगे यांच्या बेपत्ता होण्यामागे काही घातपात तर नाही ना, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
या प्रकरणी रोडगे यांच्या आई शिवकांताबाई रोडगे यांच्या तक्रारीवरून चुडावा पोलिस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे. पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह नातेवाईकांकडूनही रोडगे यांचा शोध घेतला जात आहे.
राधाजी बालाजी रोडगे (वय ३६, रा. धा. टाकळी, ता. पूर्णा, जि. परभणी) यांची उंची सुमारे ५ फूट ६ इंच असून रंग काळासावळा आणि केस काळे आहेत. बेपत्ता होताना त्यांनी पांढऱ्या रंगाचा बारीक फुलांचा शर्ट, काळी पँट आणि पायात चप्पल घातली होती. त्यांना मराठी व हिंदी भाषा बोलता येते. ते मोबाईल सोबत घेऊन गेलेले नाहीत.
रोडगे यांच्याबाबत कोणाला माहिती मिळाल्यास चुडावा पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी हानवते, पोहेकॉ. क्र. १२८८, मोबाईल क्रमांक ९०६७०७६०४८ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.