अनेक गावांना पुराचा फटका बसल्याने जलमय झालेला परिसर  (Pudhari Photo)
परभणी

Parbhani Flood | सोनपेठ तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका; पूरस्थिती नियंत्रणात

नदीकाठच्या शेतशिवारात पाणी घुसल्याने उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान

पुढारी वृत्तसेवा

Sonpeth Godavari river flood

सोनपेठ : पैठण येथील नाथसागर व माजलगाव धरणातून सुरू झालेल्या मोठ्या प्रमाणावरील पाणी विसर्गामुळे सोनपेठ तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. लासीना, विटा, थडीउक्कडगाव, वाडीपिंपळगाव, थंडीपिंपळगाव, गोळेगाव, गंगापिंपरी, लोहीग्राम आदी गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला असून नदीकाठच्या शेतशिवारात पाणी घुसल्याने उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

पूरपरिस्थिती लक्षात घेता नगरपरिषदेच्या माध्यमातून एनडीआरएफ पथकाची मदत घेण्यात आली असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तहसीलदार सुनील कावरखे व पोलीस निरीक्षक अशोक गीते यांनी थेट दौरा करून पाहणी केली आहे. मंगळवारी रात्री तहसीलदारांनी लासीना येथे मुक्काम करत परिस्थितीवर करडी नजर ठेवली.

दरम्यान, जायकवाडी व माजलगाव धरण परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने गोदावरी नदीच्या पात्रात सतत पाणी सोडले जात आहे. परिणामी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून दोन दिवसांपासून विसर्ग सुरू असल्याने पुराची स्थिती गंभीर बनली होती. गावात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी आमदार राजेश विटेकर यांनी प्रशासनाशी सतत संपर्क ठेवून आपत्ती निवारण पथक कार्यरत केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीकांत विटेकर यांनी पूरग्रस्त महिला, दिव्यांग व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेतला.

लासीना गावाला वेढा घातलेल्या पुरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तहसीलदार सुनील कावरखे, नायब तहसीलदार देवेंद्रसिंह चंदेल, मंडळ अधिकारी शिवाजी कराड, महसूल अधिकारी अमोल गर्जे यांनी थेट लासीना येथे मुक्काम ठोकून परिस्थिती हाताळली. सध्या वरून येणाऱ्या पाण्याचा ओघ काहीसा कमी झाल्याने पूरस्थिती नियंत्रणात असल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT