

Mamdapur 22 monkeys rescued
पूर्णा : तालुक्यातील ममदापूर शिवारातील पूर्णा नदीपात्रात धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पाणीपातळी वाढली. या पुराच्या पाण्यात झाडावर अडकलेल्या २२ वानरांची आज (दि.२४) ग्रामस्थ, महसूल विभाग आणि पालिका अग्निशमन दलाच्या संयुक्त प्रयत्नातून सुखरूप सुटका करण्यात आली.
नदीपात्रातून येणारा वानरांचा आर्त आवाज शेतकऱ्यांनी ऐकला आणि त्यांनी तत्काळ पोलीस पाटील, तलाठी तसेच ग्रामस्थांना कळवले. त्यानंतर महसूल कर्मचारी व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. दोरीच्या सहाय्याने नदीपात्रात उतरून वानरांना झाडावरून हुसकावण्यात आले. वानरांनी पाण्यात उड्या मारत पोहत सुरक्षित स्थळी काठ गाठला.
या मोहिमेत जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार बोथीकर, मंडळ अधिकारी सुदाम खुणे, तलाठी आर. आर. सिंगरवाड यांच्यासह गावातील कार्यकर्ते व अग्निशमन दलातील गणेश रापतवार, सोनाजी खिल्लारे, अमजद कुरेशी, दिपक गवळी, राजेश चावरिया आदींनी सहभाग घेतला.
अलीकडच्या अतिवृष्टीमुळे पूर्णा व गोदावरी नदीपात्रात पूरस्थिती निर्माण झाली असून, अशा प्रसंगी नागरिक व प्राण्यांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाने केलेल्या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.