

Hingoli crop damage
जवळाबाजार : मागील पंधरा दिवसांपासून परिसरात दररोजच वेळ बदलून विजांचा कडकडाट, जोरदार वारे, मुसळधार पाऊस आणि ढगफुटीचा मारा सुरू आहे. या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बागायती पिके आणि भाजीपाला पूर्णपणे पावसाने उध्वस्त झाला आहे. परिणामी दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे.
सोयाबीन हे खरीप हंगामातील नगदी पीक मानले जाते. शेतकरी बांधव दिवाळी सण आणि रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी याच पिकावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. मात्र सततच्या पावसामुळे सोयाबीन शेतात उगवून खराब झाले असून शेकडो एकर क्षेत्रातील पीक हातातून गेले आहे.
तसेच ऊस, केळी, पपई, संत्रा, मोसंबी यांसह इतर फळपिके आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणात पावसामुळे नष्ट झाला आहे. नदी-नाले तुडुंब भरल्याने शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे कुटुंबीय उदरनिर्वाह आणि सणावारावरच नव्हे तर आगामी रब्बी हंगामातील पेरणीचे नियोजनही धोक्यात आले आहे. शासनाकडून तुटपुंजी मदत मिळणार का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. त्यामुळे यंदा दिवाळी सण शेतकऱ्यांना ‘ओला दुष्काळग्रस्त’ म्हणून साजरी करावी लागणार आहे.