जमिनीखालून अचानक काळा धूर निघू लागल्याने परिसरात खळबळ  (Pudhari Photo)
परभणी

Parbhani Purna News | पांगरा येथे जमिनीखालून अचानक निघू लागला काळा धूर: अनपेक्षित घटनेमुळे शेतकरी भयभीत

Underground Smoke | शेतकरी नरहरी परसराम पावडे यांच्या शेतातील जमिनीखालून अचानक काळा धूर निघू लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे

पुढारी वृत्तसेवा

Purna Pangra farm underground smoke

पूर्णा : पूर्णा तालुक्यातील पांगरा लासीना गावात एक अनोखी आणि थरारक घटना घडली आहे. शेतकरी नरहरी परसराम पावडे यांच्या गट क्रमांक १०२ मधील शेतात जमिनीखालून अचानक काळा धूर निघू लागल्याने परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. या अनपेक्षित घटनेमुळे शेतकरी आश्चर्यचकित आणि काहीसे भयभीत झाले आहेत.

प्रशासनाची तत्परता घटनास्थळी धाव

शेतकरी पावडे यांनी भाजीपाला लागवडीसाठी शेताची नांगरणी करून स-या मारून ठेवल्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या शेतात जमिनीखालून, अग्नी विझल्यानंतर जसा धुर निघतो तसा, काळा धुर अधूनमधून निघताना दिसत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी जवळ जाऊन पाहणी केली असता, कुठलाही कचरा किंवा इंधन जळत नसल्याचे स्पष्ट झाले. धुर थेट जमिनीतूनच निघत असल्याचे दिसून आले.

घटनेची माहिती ग्रामपंचायत सदस्य जगदीश लक्ष्मण यांनी सरपंच आणि तहसीलदार यांना दिली. नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी ही बाब तातडीने भूगर्भ खात्याकडे कळवली आहे. चुडावा पोलिसांनीही घटनास्थळी भेट दिली असून, रक्षाबंधन आणि रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी भूगर्भतज्ज्ञ घटनास्थळी येऊन सखोल पाहणी करणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

शेतकऱ्यांमध्ये चिंता आणि संभ्रम

धुराचा उगम आणि कारण अद्याप स्पष्ट न झाल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. "काहीतरी विपरीत घडणार का?" अशी भीतीही व्यक्त होत आहे. शेतात कोणतीही रासायनिक प्रक्रिया, गोबर गॅस, किंवा विजेची अर्थिंग नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच, साखर कारखान्यातून आणलेली मळीही शेतात टाकलेली नाही.

भूगर्भातून धुर निघण्यामागची संभाव्य कारणे

जमिनीखालून धुर निघणे ही दुर्मीळ आणि असामान्य घटना आहे. तज्ज्ञांच्या मते, यामागे काही संभाव्य कारणे असू शकतात. जमिनीत कुजणारे पालापाचोळा, वनस्पती अवशेष विघटित होताना उष्णता निर्माण होऊन वायू बाहेर पडू शकतो. काही ठिकाणी नैसर्गिक वायू किंवा पेट्रोलियम वायू साचून राहिल्यास, त्याच्या ज्वलनामुळे धुर निघू शकतो. जमिनीत नैसर्गिक खनिजांचे विघटन होऊन रासायनिक क्रिया झाल्यासही धुर बाहेर पडू शकतो. जमिनीतून काही वायू बाहेर पडताना हवेच्या संपर्कात आल्यावर वाफ किंवा धुराच्या स्वरूपात दिसू शकतात.

दरम्यान, प्रशासनाने शेतकऱ्यांना घाबरून न जाता तज्ज्ञांकडून सखोल तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. या घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी भूगर्भ तज्ज्ञांची टीम सोमवारी घटनास्थळी भेट देणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT