

मानवत : राज्य सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, यासह अन्य मागण्यासाठी शुक्रवारी (दि.११) रयत क्रांती संघटनेच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री आ.सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार कार्यालयाला या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सरकारच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. सोयाबीनला दर मिळायला लागला की, सरकारने तेल आयात करुन सोयाबीनचे दर पाडले, कांद्याला दर मिळायला लागला की निर्यात शुल्क लावून कांद्याचे दर पाडले. नेहमी शेतमालाचे दर कमी होत असल्याने शेतकऱ्यांची अवस्था वाईट झाली आहे. मालाला योग्य भाव मिळत नसल्याने अनेक शेतकरी जीवनयात्रा संपवित आहेत. याची दखल घेऊन सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. यासह शासनाने सोयाबीनला प्रति क्विंटल ६ हजार तर कांद्याला प्रती क्विंटल ४ हजार भाव द्यावा, शेतात अखंडितपणे वीज पुरवठा करण्यात यावा, या मागण्याही यावेळी करण्यात आल्या.
या आंदोलनात रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर आवचार, तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम शिंदे, परमेश्वर घाटुळ, जनार्धन आवचार, परमेश्वर आवचार, राधाकिशन आवचार, अंकुश बारहाते, तुकाराम आवचार, शेषराव जाधव , पंकज आवचार, भारत सुदाम, सोपान आवचार, संतोष आवचार, सोपान जाधव, सुदाम जाधव, सुरेश मांडे, संतोष शिंदे, रोहिदास कदम हे उपस्थित होते.