संत्रा बागांना फळे लगडलेली असतानाच पाण्याअभावी झाडे सुकू लागली आहेत Pudhari
परभणी

Parbhani Drought | कोरड्या दुष्काळाचा संत्रा बागांना फटका; पिंपळा-मरसुळ शिवारात शेकडो एकरांतील बागा वाळण्याच्या मार्गावर

विहिरी, बोअरवेल कोरड्या; कालव्यातील पाण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, ट्रॅक्टरला डायनॅमो जोडून पाणीउपसा करण्याची वेळ

पुढारी वृत्तसेवा

Purna Taluka Orange Farmers Crisis

पूर्णा : पूर्णा तालुक्यातील पिंपळा लोखंडे आणि मरसुळ शिवारातील संत्रा उत्पादक शेतकरी यंदाच्या कोरड्या दुष्काळामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. शेकडो एकरांवरील संत्रा बागांना फळे लगडलेली असतानाच पाण्याअभावी झाडे सुकू लागली आहेत. विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी खोल गेल्याने सिंचनाची साधने कोरडी पडली आहेत. परिणामी, झाडांवरील परिपक्व होणारी संत्री सुकत असून फळगळ होऊन झाडांखाली फळांचा सडा पडत आहे.

संत्रा बागा वाचविण्यासाठी शेतकरी आता कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. येलदरी आणि सिद्धेश्वर धरणातून पूर्णा प्रकल्पाच्या लासिना कालव्यात सध्या कमी दाबाने पाणी सोडले जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातच वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने कालव्यातील पाण्याचा उपसा करण्यासाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या इंजिनाला डायनॅमो जोडून कृषिपंप चालवावे लागत आहेत. बागा वाचविण्यासाठी सुरू असलेल्या या धडपडीत शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.

डिझेलसाठी दागिने विकण्याची वेळ

ट्रॅक्टरच्या साहाय्याने पाणी उपसा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिझेल खर्च होत आहे. आधीच दुष्काळामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांकडे खर्चासाठी पैसे शिल्लक नाहीत. त्यामुळे काही शेतकऱ्यांना डिझेल खरेदी करण्यासाठी घरातील महिलांच्या अंगावरील दागिने विकण्याची वेळ आली आहे. एका बाजूला बागा वाळण्याची भीती, तर दुसरीकडे त्यांना जगविण्यासाठी वाढणारा खर्च, अशा दुहेरी संकटात संत्रा उत्पादक सापडले आहेत.

कालव्याच्या नियोजनावर शेतकऱ्यांचे प्रश्नचिन्ह

वसमत विभागाच्या पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या हलगर्जीपणामुळे कालव्यात पुरेशा दाबाने पाणी सोडले जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पाणीपाळी सुरू होण्यापूर्वी कालव्याची आवश्यक दुरुस्ती करण्यात आली नसल्याने अनेक ठिकाणी कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. असे असताना आता कालव्यात कमी प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नसल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत.

कालव्यात पुरेशा दाबाने पाणी का सोडले जात नाही? पाणी वितरणाचे योग्य नियोजन का केले जात नाही? पाटबंधारे विभागाचे अधिकारी याकडे लक्ष देणार की नाहीत, असे प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

मागील दुष्काळाच्या जखमा अद्याप ताज्या

पिंपळा लोखंडे हे गाव मराठवाड्यात संत्रा उत्पादकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. मागील कोरड्या दुष्काळातही येथील शेतकऱ्यांनी कर्ज काढून, सावकारांकडून व्याजाने पैसे घेऊन टँकरद्वारे पाणी विकत घेत बागा जगविण्याचा प्रयत्न केला होता. तरीही अनेकांच्या संत्रा बागा वाळून गेल्या आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

आता पुन्हा एकदा त्याच परिस्थितीची पुनरावृत्ती होत असून, कालव्यातील पाणी ट्रॅक्टरला डायनॅमो जोडून कृषिपंपाद्वारे बागांना देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. एवढे कष्ट घेऊन बागा वाचविण्याचा प्रयत्न सुरू असताना काही जणांकडून त्यावर आक्षेप का घेतला जात आहे, असा सवाल संत्रा उत्पादक शेतकरी एकनाथ लोखंडे यांनी उपस्थित केला. संत्रा बागा वाचविण्यासाठी पाटबंधारे विभागाने कालव्यात पुरेशा दाबाने पाणी सोडून योग्य नियोजन करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT