Purna Mango Trees Bloomed
आनंद ढोणे
पूर्णा : तालुक्यात पौष महिना सुरू होताच आंब्याच्या झाडांवर मोहोर (फुलोरा) फुटू लागल्याने शेतशिवारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील सलग लागवड केलेल्या अंबराई तसेच शेतांच्या बांधावर उभ्या असलेल्या संकरीत व गावरान आंब्याच्या झाडांवर मोठ्या प्रमाणात फुलोरा लागलेला दिसत आहे. झाडांच्या फांद्या मोहोरांनी अक्षरशः लदबदून गेल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
यावरून यंदाचे औंदा नैसर्गिक हवामान आंब्याच्या मोहोरासाठी अनुकूल असल्याचे संकेत मिळत आहेत. अंबराई फुलू लागल्यामुळे येत्या उन्हाळ्यात आंबा फळांचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार असल्याची आशा शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
मागील काही वर्षांत रोजगार हमी योजनेअंतर्गत मिळालेल्या अनुदानाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी केशर तसेच इतर सुधारित वाणांची सलग क्षेत्रात लागवड केली आहे. ही आंब्याची झाडे आता उत्पादनाच्या टप्प्यात आली असून फळधारणा सुरू झाली आहे. फळबाग लागवडीमुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन मिळून आर्थिक उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा आहे.
याशिवाय काही शेतकऱ्यांच्या शेतात बांधावर जुनी, मोठी गावरान आंब्याची झाडे आजही उभी आहेत. या गावरान झाडांना मोहोर येण्यास तुलनेने उशीर लागतो, तर संकरीत आंब्याच्या झाडांवर पौंष महिन्यापासूनच मोहोर दिसू लागतो. त्यामुळे यंदाचे वर्ष आंबा उत्पादनासाठी पोषक ठरण्याची शक्यता आहे.
मात्र, सध्या मोहोर लागला असला तरी नैसर्गिक हवामानातील बदल, दव किंवा धुक्याचा प्रादुर्भाव झाल्यास फुलोरा गळण्याचा धोका संभवतो. हवामान अनुकूल राहिल्यास मोठ्या प्रमाणात अंबराई बहरून रसाळ आंब्यांचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल. तसेच आंबा फळांच्या विक्रीतून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ होईल. यासोबतच कैरी, लोणचं आणि पिकलेल्या आंब्यांचा मनमुराद आनंद लुटता येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.