केशरासह विविध संकरीत व गावरान झाडे कैऱ्यांनी अक्षरशः लगडली आहेत.  Pudhari
परभणी

Mango Production Purna | पूर्णेतील शिवारात कैऱ्यांनी झाडे लगडली; यंदा आंब्यांचे भरघोष उत्पादन होण्याची चिन्हे

महिला बचत गटांकडून लोणच्याच्या उद्योगासाठी आंबट कैऱ्यांची खरेदी

पुढारी वृत्तसेवा

Purna mango growers success

आनंद ढोणे
पूर्णा :
तालुक्यातील शेतशिवारात यंदा केशरासह विविध संकरीत व गावरान आंबा झाडांना मोठ्या प्रमाणात कोवळ्या कैऱ्या लागल्याचे चित्र दिसत आहे. झाडे कैऱ्यांनी अक्षरशः लगडली आहेत. त्यामुळे यंदाच्या उन्हाळी हंगामात आंब्याचे भरघोस उत्पादन हाती येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

यावर्षी नैसर्गिकरीत्या आंबा झाडांना मुबलक फुलोरा आला होता. काही प्रमाणात फुलगळ झाली असली तरी झाडांवर आता चांगल्या प्रमाणात फळधारणा सुरू झाली आहे. विशेषतः पौष महिन्यात केशर व इतर संकरीत वाणांच्या झाडांना मोठ्या प्रमाणात कैऱ्या लागल्या आहेत. अनेक ठिकाणी बोऱ्यासारख्या दाटीवाटीने कैऱ्या झाडांवर दिसत आहेत.

तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये जुनी गावरान आंबा झाडेदेखील फळांनी बहरली आहेत. रोजगार हमी योजनेअंतर्गत तसेच खासगी पद्धतीने लागवड केलेल्या केशर आंब्याच्या बागाही यंदा फळांनी वाकल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

आंब्याच्या बागांची पाहणी करण्यासाठी व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर भेटी देत असून काही ठिकाणी घरगुती वापरासाठी थोडा माल ठेवून उर्वरित फळांचे सौदेही होत आहेत. बचत गटांतील महिला लोणच्याच्या उद्योगासाठी आंबट कैऱ्यांची खरेदी करत असल्याचेही चित्र आहे.

एकंदरीत, यंदा आंबा पिकासाठी पोषक हवामान लाभल्याने उत्पादन वाढीची आशा व्यक्त केली जात आहे. तथापि, पुढील काळात अवकाळी पाऊस, वादळी वारे किंवा गारपीट झाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हंगाम निर्विघ्न पार पडावा, अशी प्रार्थना शेतकरी निसर्गाकडे करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT