

Jintur Gram Sevak bribe case
परभणी : जिंतूर तालुक्यातील वरूड ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक संतोष दशरथ पांडे (वय ४४) यांना १,५०० रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षांची सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली. सोमवारी (दि. २) हा निकाल देण्यात आला.
तक्रारदाराने खरेदी केलेल्या मोकळ्या जागेची नोंद त्यांच्या नावावर करण्यासाठी तसेच नमुना क्रमांक ८ ची नक्कल देण्यासाठी आरोपी ग्रामसेवकाने १,५०० रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. पंचासमक्ष लाच स्वीकारताना आरोपीला रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ३००९/२०१४ नोंदवून भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७, १३ (१)(ड) व १३ (२) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक दिपक दंतुलवार यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीस कलम ७ अंतर्गत दोन वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली. तसेच कलम १३ (१)(ड) अंतर्गतही दोन वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावण्यात आली.
सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ए. एन. गिराम यांनी बाजू मांडली. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलाणी तर अंमलदार म्हणून पोलीस नाईक संतोष बेंद्र यांनी काम पाहिले. या कारवाईस लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे व अपर पोलीस अधीक्षक अशोक कदम यांचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, शासकीय कामासाठी कोणी लाच मागितल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने नागरिकांना केले आहे.