Kanadkhed Gram Panchayat Illegal Demolition
पूर्णा : तालुक्यातील कानडखेड क्र. १ येथे असलेली ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत कोणतीही शासकीय परवानगी न घेता सरपंचाने जेसीबीच्या साहाय्याने पाडल्याचा धक्कादायक प्रकार चौकशीतून समोर आला आहे. तसेच इमारतीचे बांधकाम साहित्यही गायब करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या जागेवर मनमानी पद्धतीने तलाठी कार्यालय उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
ग्रामपंचायत कार्यालयाची सुस्थितीतील इमारत संबंधित विभागाची मंजुरी न घेता पाडण्यात आल्याची तक्रार ग्रामस्थांनी यापूर्वी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत पूर्णा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व्ही. के. पुरी, बांधकाम उपअभियंता डी. जी. सोनकांबळे आणि शाखा अभियंता एस. यू. बांगर यांनी १ जून रोजी कानडखेड क्र. १ येथे स्थळ पाहणी केली.
पाहणीदरम्यान ग्रामपंचायत कार्यालयाची जुनी इमारत पूर्णपणे पाडण्यात आल्याचे आढळून आले. तसेच दगड, विटा, पत्रे, लोखंडी अँगल, स्लॅब, दरवाजे, फरशी आदी कोणतेही बांधकाम साहित्य घटनास्थळी उपलब्ध नसल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. इमारत पाडण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही प्रशासकीय मंजुरी अथवा निर्लेखनाचा प्रस्ताव बांधकाम विभागाकडून घेण्यात आलेला नसल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे.
अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार, ग्रामपंचायत इमारतीच्या जागेवर सध्या तलाठी भवनाचे बांधकाम जोत्याच्या पातळीपर्यंत करण्यात आलेले दिसून आले. इमारत परस्पर पाडण्यात आल्याने तिचे मूल्यांकन करणे शक्य नसल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
स्थळ पाहणीचा सविस्तर अहवाल पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी नारायण मिसाळ यांनी दिली.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सरपंचाच्या मनमानी कारभाराबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा गावकरी लवकरच आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारतील, असा इशारा माजी सरपंच तुकाराम साल्पे, काशीनाथ बनसोडे, चांदोजी डांगरे, गंगाप्रसाद डाढाळे आणि सिताराम कोठारे यांनी दिला आहे.
ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत पाडल्यामुळे ग्रामसभा, मासिक बैठका तसेच ग्रामपातळीवरील विविध प्रशासकीय कामकाजात मोठ्या अडचणी निर्माण झाल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.